‘लॉज हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले असून यातून ‘कोरोना’चा संसर्ग पसरण्याचा धोका’, शिवसेनेच्या नेत्याचा इशारा

मीरारोड : पोलीसनामा ऑनलाइन – मीरा भाईंदरमधील लॉज हे वेश्याव्यवसायाचे अड्डे बनले असून यातून कोरोनाचा संसर्ग पसरणाचा धोका आहे. अशा लॉजवर ऑर्केस्ट्रा बार व बार हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करा, त्यांचे परवाने रद्द करा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त व पालिका आयुक्तांना भेटून केली आहे. गांधी जयंती आधी ही कारवाई करावी अन्यथा समाजाच्या हितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.

सरनाईक म्हणाले, शहराच्या वेशीवर स्प्रिंग लॉजिंग व बोर्डिंग, साई सनिधी बार, बेकयार्ड बीअर गार्डन, आर ब्रीविंग कंपनी पासून उत्तनच्या सिल्वर डोअर युटर्नपर्यंत अनेक लॉज बारची बेकायदेशीर बांधकामे आहेत. अंतर्गत बेकायदा बांधकामे झाली असून या ठिकाणी छुप्या खोल्या बांधण्यात आल्या आहेत. शहरातील लॉज, ऑर्केस्ट्रा बार यामुळे गैरप्रकार वाढले आहेत. लॉजच्या आड अनैतिक व्यवसाय वाढले आहेत. यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संसर्ग काळात तर बेकायदा बांधकामांचे पेव फुटलेले आहेत. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्याशी अर्थपूर्ण व्यवहार करुन ज्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात ही बांधकामे झाली आहेत, त्या अधिकाऱ्यांची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. मागील पाच महिन्यात झालेली ही अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी महापालिकेने कालबद्ध मोहिम आखून सर्व बांधकामे तात्काळ तोडून टाकावीत. याच महिन्यात ही कारवाई करण्याची मागणी सरनाईक यांनी केली आहे.

तरुण पिढीला वाईट मार्गाला लावणारी ही अनैतिक व्यवसायाची केंद्र असून पालिकेने प्रामाणिकपणे यावर कारवाई करावी तसेच भविष्यात अशी केंद्रे परत उभारली जाणार नाहीत अशी कडक कारवाई करावी. मुंबईतील कमला मिल कमपाउंड येथील एका रेस्टॉरंटला लागलेल्या आगीनंतर मीरा भाईंदर महापालिकेनेही अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना नोटीसा पाठवल्याचे सांगितले. मात्र प्रत्यक्षात कोणतीही कारवाई झालेली नाही. पूर्णपणे अनधिकृत व विनापरवाना व्यवसाय करत असलेल्यांवर मनपा प्रशासन मेहेरबान का आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

आमदार प्रताप सरनाईक यांनी पोलीस आयुक्त सदानंद दाते आणि पालिका आयुक्त डॉ. विजय राठोड यांना भेटून वरील मागण्या केल्या असून त्यांनी निवेदन दिले आहे.