शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न, बुलढाण्यात खळबळ

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – वादग्रस्त वक्तव्यामुळे काही दिवसांपूर्वी राज्यभर चर्चेत असलेले बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्या इनोव्हा कारवर पेट्रोल टाकून ती जाळण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना गायकवाड यांच्या घरासमोर आज (बुधवार) पहाटे तीनच्या सुमारास घडली आहे. वाहन जाळण्यापूर्वी जुनागाव परिसरातील वीज पुरवठाही खंडीत करण्यात आला होता. या घटनेमुळे बुलडाण्यात खळबळ उडाली आहे. हा पूर्वनियोजित कट होता, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे.

संजय गायकवाड यांनी नेहमी प्रमाणे आपली गाडी इनोव्हा कार घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी वाहन जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेत गाडीच्या मागील भागाचे नुकसान झाले आहे. घटना घडली त्यावेळी संजय गायकवाड हे घरी नव्हते. कामानिमित्ताने ते मुंबईला गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी गाडी जाळण्याचा प्रयत्न केला.

माझी गाडी जाळून मोठा स्फोट घडविण्याचा कट असल्याचा आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. तसेच राजयकीय वादातून हा हल्ला करण्याचा प्रयत्न असावा असा संशय गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुसरीकडे या घटनेसंदर्भात गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशीही आमदार संजय गायवकाड यांनी संपर्क साधला असून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे. त्यानंतर हे प्रकरण सध्या डीआयजीस्तरावरुन हाताळण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेसह, श्वान पथक, ठसे तज्ज्ञांचे पथकही सकाळीच गायकवाड यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत.

काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड हे आपल्या वेगवेगळ्या विधानामुळं चर्चेत आले आहेत. मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते. अशा प्रकरारचे वक्तव्य संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यानंतर बुलढाण्यात शिवसेना व भाजप यांच्यात वाद चांगलाच पेटला होता.