अजित पवारांच्या ‘या’ निर्णयावर शिवसेना आमदारांची ‘खोचक’ टीका

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्याला पाण्याचा प्रश्न भेडसावत असताना दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी तत्कालीन भाजप सरकारने वॉटर ग्रीड योजना सुरु केली होती. मात्र, ही योजना तांत्रिकदृष्ट्या सक्षम नसल्याचे सांगत ती बंद करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. ही योजना बंद करण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयावर शिवसेनेचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शिक्का पुसण्यासाठी 21 टीमसी पाणी किंवा वॉटर ग्रीड असलेल्या या योजना आहेत. त्या सुरु राहिल्या पाहिजेत असे सांगत त्यांनी अजित पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आम्ही आता सत्तेत आहोत, या योजना व हे पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करु. प्रसंगी मराठवाड्यातील सर्व आमदार एकत्र येऊ, असे वक्तव्यही आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे.

मंत्रिमंडळ विस्तारामध्ये स्थान मिळाले नसल्याने तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या. तानाजी सावंत हे मंत्रीपदासाठी इच्छूक होते मात्र त्यांना डावलण्यात आल्याने ते नाराज होते अशी चर्चा होती. यावर त्यांनी मी नाराज नसून माझ्या नाराजीच्या बातम्या फक्त प्रसारमाध्यमांमध्येच आहेत. माझी भूमिका ही पक्षप्रमुख यांना माहीत असल्याचे तानाजी सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले. आमदार तानाजी सावंत यांनी मंगळवारी तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.