‘शिवसेना-मनसे’ भगव्यासाठी ‘आमने-सामने’, भाजपला बसणार फटका ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपल्या भूमिकेत काहीसा बदल करून हिंदुत्वाची कास धरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपसोबत हिंदुत्वाच्या मार्गावर चालत होती. परंतु आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर मात्र शिवसेनेनं आपल्या भूमिकेत काहीसा बदल केला आहे. याच संधीचं सोनं करत मनसेनं हिंदुत्वाची कास धरली आहे. मनसेच्या या नव्या भूमिकेनं महाविकासआघाडी पेक्षा भाजपलाच जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

राज ठाकरेंनी नुकताच महाअधिवेशन सोहळा घेतला. यात त्यांनी हिंदुत्वावरून भाष्य केलं. मी रंग बदलत नाही असंही त्यांनी म्हटलं होतं. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही याला उत्तर दिलं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की, आपला अंतरंग देखील भगवा आहे. हिंदुत्वासाठी भविष्यात दोन्ही ठाकरे आता आमने-सामने येण्याची दाट शक्यता असल्याचं यावरून दिसत आहे.

मनसेच्या हिंदुत्वाची कास धरण्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जास्त फटका बसेल असं वाटत नाही. शिवसेनाही आहे त्या स्थितीत राहण्याची शक्यता आहे. पंरतु भाजपला याचा फटका बसू शकतो. शिवसेना आणि मनसे भगव्यासाठी लढत असतानाच भाजपंही हिंदु मतांसाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे. असं असलं तरी भाजपचं धोरण हे सबका साथ सबका विकास आहे. त्यामुळे भाजपला हिंदू मतांप्रमाणेच इतर मतांचीही गोळा बेरीज करावी लागणार आहे. शिवसेना आणि मनसेप्रमाणे भाजपला प्रखर हिंदुत्व घेऊन पुढे जाता येणार नाही. त्यामुळे कट्टर हिंदुत्वाची कास धरणाऱ्या मनसेला फायदा होण्याची शक्यता आहे मात्र भाजपला यचा जास्त फटका बसण्याची शक्यता आहे.

फेसबुक पेज लाईक करा –