शिवसेनेने केली अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये शाब्दीक चकमकी होत आहेत. भाजपने स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली असतानाच शिवसेनेने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भरतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी शिवसेनेने सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केली होती. त्यातच आता त्यांनी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून मुंबईतील खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज लोकसभेत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली. त्यापाठोपाठ शिवसेनेचे मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची मागणी केली. आपल्या साहित्यातून दलितांच्या उत्थनासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे थोर साहित्यीक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारताचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी राहुल शेवाळे यांनी लोकसभेत लावून धरली.

एका साधारण मातंग कुटुंबात जन्माला आलेल्या अण्णाभाऊंनी त्यांच्या लेखणीतून दलित आणि कष्टकऱ्यांच्या वेदनांना वाचा फोडली. ३५ कादंबऱ्या, १५ कथासंग्रह, नाटक आणि पोवाडे अशी विपुल ग्रंथसंपदा अण्णाभाऊंनी निर्माण केली. जगभरातील २७ भाषांमध्ये त्यांच्या साहित्याची भाषांतरे करण्यात आली.

त्यामुळे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी देशभरातून होत असल्याचे शेवाळे यांनी लोकसभेत सांगितले. लोकशाहिरांच्या कार्याचा गौरव करण्याच्या मागणीसाठी काही महिन्यांपूर्वी खासदार शेवाळे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले होते. मंगळवारी खासदार शेवाळे यांनी या मागणीचा पुनरुच्चार लोकसभेत केला.

Visit : Policenama.com