UP अत्याचार प्रकरण : ‘आता कुठं आहेत रामदास आठवले ?’, संजय राऊतांनी फटकारलं

पोलिसनामा ऑनलाइन – उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये 19 वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आणि पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपसह रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांच्यावर निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशला रामराज्य म्हटलं जातं. तिथं एका मुलीवर बलात्कार, खून होतो आणि आरोपींना वाचवलं जातं. इतरत्र मात्र कुण्या अभिनेत्रीच्या घरावरील कौले जरी उडवली गेली तरी त्याला अन्याय म्हटलं जातं. आता कुठे आहेत रामदास आठवले ? असं म्हणत राऊतांनी रामदास आठवले यांना फटकारलं आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी करणाऱ्यांची युपीबाबत काय भूमिका आहे? त्यांनी तिथं राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी असा सल्लाही राऊत यांनी रामदास आठवलेंना दिला आहे. वेगळ्या राज्यात अशा घटना घडतात तेव्हा आवाज उठतो मग आता का नाही ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. आम्ही शांतपणे याकडे पहात आहे. संधी मिळेल तेव्हा आवाज उठवू असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

अभिनेत्री कंगना राणावतच्या बेकायदेशीर कार्यालयावर मुंबई महापालिकेनं कारवाई केल्यानंतर रामदास आठवले यांनी कंगनाची पाठराखण केली होती. कंगनावर अन्याय झाला अशी त्यांची भूमिका होती. इतकंच नाही तर त्यांनी कंगनाची भेट घेत तिला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणीही त्यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर आता राऊतांनी आठवलेंवर सडकून टीका केली आहे.