संजय राऊतांचा मनसेला ‘अप्रत्यक्ष’ टोला, म्हणाले – ‘हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनी रूजवला, काहींना आता पालवी फुटली’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : आज मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या दिशेने जाण्याचे संकेत दिले. तसेच मनसेने आपला जुना झेंडा बदलून त्याऐवजी आता राजमुद्रा असलेल्या भगव्या झेंड्याचे अनावरण केले.

दरम्यान, मनसेच्या या हिंदुत्वाच्या वाटचालीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला. संजय राऊत म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी खरा प्रखर हिंदुत्वाचा विचार जनमानसांत रुजवला आता काही लोकांना पालवी फुटली आहे. असे त्यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत म्हणाले की बाळासाहेब ठाकरे हे कोणत्याही पदावर नव्हते परंतु जगतज्जेत्या अलेक्झांडरप्रमाणे ते वावरले. त्यांनी लोकांना गोळा केले आणि लढण्याची प्रेरणा दिली. आज देखील शिवसेना त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत चालत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्वाची प्रखर ज्योत पेटवली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनंतर हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब ठाकरे आहेत असे देखील त्यांनी स्पष्ट केले.

तसेच हिंदुत्वाचा विचार बाळासाहेबांनीच रुजवला आहे आणि आता बाकीच्यांना पालवी फुटली आहे तर फुटू द्या, पण बाळासाहेबांना आणि शिवसेनेला तोड नाही. म्हणून बाळासाहेबांचे स्मरण फक्त २३ जानेवारीलाच नाही तर महाराष्ट्रात आणि देशात रोजच होत असते. असे देखील राऊत यांनी स्पष्ट केले.

तसेच संजय राऊतांनी म्हटले की, राज्य सरकारला १०० दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येला जातील. तसेच महाविकास आघाडीतील नेत्यांनीही त्यांच्यासमवेत अयोध्येला यावे असे ही राऊतांनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा –