चंद्राबाबूंच्या उपोषणाला शिवसेनेचा पाठिंबा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी आज दिल्ली येथे एकदिवशीय उपोषण सुरू केले आहे. आंध्रला विशेष राज्याच्या दर्जा मिळावा अशी त्यांची मागणी आहे. दिल्लीतील आंध्र भवनमध्ये ते उपोषणाला बसले आहेत. मुख्य म्हणजे त्यांच्या या पाठिंब्याला राहुल गांधींनी पाठिंबा दिला होता. यानंतर आता एनडीएचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने चंद्राबाबू नायडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी (दि.११) चंद्राबाबू यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. इतकेच नाही तर, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे देखील चंद्राबाबूंना भेटले. दिल्‍लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील नायडू यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले.

मुख्य म्हणजे आंध्रला विशेष राज्याचा दर्जा देण्यात यावा अशी नायडू यांची मागणी आहे. यासोबतच राज्याची निर्मिती करण्यात आली त्यावेळी जी वचने देण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात यावीत असेही नायडू यांनी स्पष्ट केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला टक्कर देण्यासाठी विरोधक एकत्र येत असून त्यांची महाआघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. महाआघाडीसाठी चंद्राबाबू नायडू यांनी पुढाकार घेतला आहे.

नायडू यांनी सकाळी ८ वाजता उपोषणाला प्रारंभ केला आहे. दरम्यान तेलुगू देसम पक्षाने दिलेल्या माहितीनुसार उपोषण रात्री ८ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. शिवाय उद्या (ता.१२) ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निवेदन सुद्धा देणार आहेत असेही समजत आहे. आंध्रचे विभाजन झाले, इतकेच नाही तर, विभाजनावेळी आंध्रावर अन्याय झाला असे नायडू यांचे मत आहे. यामुळेच नायडू यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला रामराम ठोकला होता.