‘हे तर महाराष्ट्राचे दुश्मन, 5 नव्हे पुढची 25 वर्षे घरी बसवणार’ ! खा. राऊतांचे सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – वास्तुरचनाकार अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात ( anvay-naik-suicide-case) अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यापासून भाजप ठाकरे सरकारविरोधात आक्रमक झाली आहे. नाईक आणि ठाकरे कुटुंबीयांमध्ये झालेल्या जमीन व्यवहारावरून उलटसुलट आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार समाचार घेतला आहे. कोण आहे हा माणूस? 2014 साालातील हा कायदेशीर व्यवहार आहे. त्याचे कागद हातात घेऊन हा गिधाडासारखा फडफडतोय. मराठी माणसाने केलेला व्यवहार यांच्या डोळ्यांत खुपतोय का? असा संताप राऊत यांनी व्यक्त केला. 21 व्यवहाराचा आरोप हा खोटारडेपणाचा कळस आहे. त्यांना ही वॉर्निंग आहे. त्यांनी कितीही फडफड केली तरी हे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचे राऊत यांनी ठणकावले आहे.

किरीट सोमय्या यांनी नाईक व ठाकरे कुटुंबामध्ये 21 जमीन व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट एका पत्रकार परिषदेत केला आहे. या दोन कुटुंबांचा नेमका काय संबंध आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. सोमय्यांच्या या आरोपांना राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना प्रत्युत्तर दिले आहे. कोणी काय व्यवहार करावा आणि कशासाठी करावा? हे शेठजींच्या पक्षाचे व्यापारी प्रवक्ते सांगू नये. मुळात हे एका व्यक्तीच्या मृत्यूचे प्रकरण आहे. त्यांची पत्नी व कन्या न्यायासाठी आक्रोश करताहेत. त्याबद्दल शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते बोलत नाहीत. आम्ही त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना हे कुठलेही फालतू मुद्दे घेऊन पुढे येत आहेत. तपासाची दिशा भरकटवण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्यायची आहे. गुन्हेगारांना कायद्याच्या चौकटीत शिक्षा देण्याची आहे. शेठजीच्या पक्षाच्या प्रवक्त्यांना गुन्हेगारांना वाचवायचे आहे. त्यासाठी ही फडफड सुरू आहे, पण त्यातून काही निष्पन्न होणार नाही असे ते म्हणाले.

गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुरुंगात जाता, कोण लागतो तो तुमचा
नैराश्य आणि वैफल्यातून हे सगळे उद्योग सुरू आहेत. एका गुन्हेगाराला भेटण्यासाठी तुरुंगात जाता. आकांडतांडव करता. कोण आहे तो तुमचा ? एका मराठी महिलेचा पती, सासू मेलीय. ती कोणी लागत नाही का तुमची ?, असा सवाल करतानाच, ‘हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. महाराष्ट्राच्या मुळावर येणारे हे व्यापारी आहेत, म्हणूनच आम्ही त्यांना घरी बसवले आहे. पाच नव्हे आणखी 25वर्षे तुम्हाला घरी बसवू, असेही राऊत यांनी म्हटले आहे.