कमिशन मागणाऱ्या आमदार – खासदारांचं नाव उघड करा, राऊतांनी केलं गडकरींना ‘आव्हान’

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते विकासाच्या कामात टक्केवारी मागणाऱ्या आमदार खासदारांची नावे उघड करावीत. तसेच हव्या त्या यंत्रणेकडून चौकशी करावी असं आव्हान शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिले आहे. तसेच चौपदरीकरणाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या आणि हजारो उकळणाऱ्या सरकारी कंत्राटदारांची नावे नितीन गडकरींनी ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे असा टोला देखील लगावला.

गडकरींची मागणी काय आहे ?
राज्यात रस्त्यांचा विकास करत असताना त्या भागातील आमदार – खासदार हे कंत्राटदारांवर दबाव टाकून कामामध्ये अडथळा आणतात अशा तक्रारी अनेक कंत्राटदारांनी सीबीआयकडे केल्या होत्या. त्यामुळे नितीन गडकरी यांनी अशा आमदार खासदारांवर धाडी टाकण्यात याव्यात असे सीबीआय संचालकांना सांगितले होते. दरम्यान सीबीआयने चौकशी केली तर विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील १२ आमदार आणि ८ खासदार हे सीबीआयच्या रडारवर आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विनायक राऊतांचा गडकरींना टोला
सध्या कोकणातील मुंबई गोवा हायवेचं चौपदरीकरणाचे काम रखडलेल्या अवस्थेत आहे. त्या पार्श्वभुमीवर कोकणातले खासदार विनायक राऊत यांना गडकरींनी सीबीआयला केलेल्या शिफारशीबाबत विचारले असता राऊत यांनी गडकरींना नावे उघड करण्याचे आव्हान दिले आहे. कोकणात रत्नागिरीतल्या वाकेड ते सिंधुदुर्गातल्या झारापपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम चालू आहे परंतु वाकेड ते संगमेश्वर चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. हे काम एमईपी या कंपनीला देण्यात आले होते मात्र त्यांनी काम सुरुच केले नाही. त्यामुळे या कंपनीकडून हे काम काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे कमिशनखोर आमदार आणि खासदारांची चौकशी करण्याची घोषणा करणाऱ्या गडकरींनी दिरंगाई करणाऱ्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकावे, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे.

दरम्यान रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केल्याने अनेक वर्षांपासून रखडलेले मुंबई – गोवा हायवेचं काम सुरु झाले होते आणि हे काम २०१९ पर्यंत पूर्ण होणार होते, मात्र तसे झालेले नाही त्यामुळे यामागील कारणे काय आहेत याचा तपास केला तर ठेकेदारांनी सांगितले की आमदार – खासदार कमिशन मागत असल्याने हे काम रखडलेल्या अवस्थेत आहे.

फेसबुक पेज लाईक करा –