‘नारायण राणेंना BJP मध्ये घेऊन पनवती लावून घेतली आणि आता राज ठाकरेंना घ्या’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपतील जवळी वाढू लागली आहे. त्यातच आज (रविवार) भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्या भेटीवर शिवसेना खासदार विनायक राऊत यांना विचारले असता त्यांनी भाजपने राज ठाकरे यांना सोबत घ्याव, असे मत व्यक्त करत निशाणा साधला.

राऊत म्हणाले, भाजपचं दिल्लीत पानीपत झालं आहे. तसेच भाजपचे खासदार नारायण राणे यांना पक्षात समावेश करून भाजपने पनवती लावून घेतली असल्याचे सांगत विनायक राऊत यांनी भाजपला टोला लगावला. त्याचप्रमाणे राज ठाकरे आणि भाजपच्या नेत्यांच्या भेटीगाठीच्या प्रश्नावर बोलताना राज ठाकरेंना भाजपने सोबत घ्यायचं असेल तर घ्यावे, कारण मागचा इतिहास पाहिला तर भाजपची वाटचाल ही झिरो पर्सेंटकडे चालली असल्याचे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजप आणि मनसेमध्ये जवळीक वाढत चालली आहे. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरुद्धच्या मनसेच्या मोर्चा आधीदेखील आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रभादेवी येथे राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतली होती.
दरम्यान, भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर मनसेने अचानक हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे महाराष्ट्रातील या बदलत्या राजकीय स्थितीत हिंदुत्वाची कास धरणारा मनसे हा पक्ष आपला नवा मित्र पक्ष होऊ शकतो, असे भाजपला वाटत आहे. तर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देखील मनसेच्या या भूमिकेचे स्वागत करत मनसे भाजप युतीचे संकेत दिले होते. त्यामुळे 2022 मध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-मनसे एकत्र लढणार का अशी चर्चा सुरु झाली आहे.