ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा लोणे तर, उपाध्यक्षपदी सुभाष पवार बिनविरोध

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी सुषमा सागर लोणे तर, उपाध्यक्षपदी सुभाष गोटीराम पवार यांची आज बिनविरोध निवड झाली. ठाणे जिल्हा परिषदेवर शिवसेना-राष्ट्रवादीने वर्चस्व सिद्ध केले आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष सुषमा लोणे या कल्याण तालुक्यातील खडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आल्यात तर, उपाध्यक्ष सुभाष पवार हे मुरबाड तालुक्यातील कुडवली गटातून जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत.

आजच्या ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीही पुन्हा शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन महाआघाडी गठीत केली. यासाठी ठाणे येथील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या समवेत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाआघाडी गठीत केली. एन.के.टी कॉलेजच्या सभागृहात पीठासीन अधिकारी अविनाश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) तथा सभा सचिव छायादेवी शिसोदे आदी उपस्थित होते.

ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रथम सार्वत्रिक निवडणुकीनंतर सध्या कार्यरत असणाऱ्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाचा पदावधी 15 जुलै रोजी पूर्ण झाला. त्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या दोन्ही पदासाठी एक-एकच अर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली, असे पीठासीन अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी अविनाश शिंदे यांनी घोषित केले. ही प्रक्रिया पार पाडताना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे पालन केले.