प्रतिक्षा संपली ! शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते उद्या राज्यपालांना भेटणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. उद्या शनिवारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे नेते राज्यपालांची भेट घेतील. याविषयी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे.

नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्या राज्यपालांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्येवर चर्चा केली जाईल. सरकार स्थापनेचा दावा याक्षणी सादर केला जाणार नाही. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पत्रकार परिषदेत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील शेतकरी प्रचंड त्रस्त आहेत. अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी मोठ्या संकटात आहेत.

महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागले आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम (सीएमपी) वर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात सहमती झाली आहे. दरम्यान, शरद पवार म्हणाले आहेत की, जर कोणी मुख्यमंत्रीपदासाठी दावा करत असेल तर ते त्यावर विचार करतील.

नवीन फॉर्म्युला काय आहे?

सत्तास्थापनेच्या फॉर्म्युल्याअंतर्गत शिवसेनेला 16, राष्ट्रवादीला 14 आणि कॉंग्रेसला 12 कॅबिनेट पदे दिली जाऊ शकतात. तिन्ही पक्षांमधील करारानुसार शिवसेनेचा पाच वर्षे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहणार आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्रीपद कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या खात्यात येईल.

महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट

21 ऑक्टोबरला झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेने एकत्रित निवडणूक लढविली, त्यामध्ये भाजपाने 105 जागा जिंकल्या. त्याचवेळी राज्यात शिवसेनेने 56 जागा जिंकल्या. यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी निर्माण झालेल्या वादामुळे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दूर गेले. राज्यात एकट्याने सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्याचे भाजपने जाहीर केले. अशा परिस्थितीत राज्यपालांनी राज्यातील दुसरा सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापण्यासाठी निमंत्रण दिले. काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा वेळेत न मिळाल्याने शिवसेना बहुमत सिद्ध करू शकली नाही. त्यानंतर राष्ट्रवादीला निमंत्रण दिले असता त्यांनीही असमर्थता व्यक्त केली त्यांनतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like