राज्यसभेच्या 7 व्या जागेसाठी शिवसेना-राष्ट्रवादीत ‘रस्सीखेच’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 7 जागा येत्या 2 एप्रिल रोजी रिक्त होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या 2 भाजपच्या 2 तर काँग्रेस आणि शिवसेना अपक्ष प्रत्येकी 1 अशा जागांचा समावेश आहे. रिक्त होणाऱ्या जागांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. यामधील शरद पवार आणि रामदास आठवले हे दोन्ही नेते राज्यसभेवर पुन्हा जाणार हे जवळपास निश्चित आहे. संख्याबळानुसार सातव्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या तीन जागा निवडून येतील अशी स्थिती आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची प्रत्येकी एक जागा निवडून येऊ शकते. मात्र, चौथी जागा आपल्या हाती लागावी यासाठी शरद पवार आग्रही आहेत. तर सर्वानुमते या जागेसाठी उमेदवार द्यावा अशी भूमिका शिवसेनेने घेतली आहे. सध्या याच जागेवरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. ही जागा आपल्याला मिळावी यासाठी दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते ताकद लावत असून अनेक तडजोडी करत आहेत. या दोन्ही पक्षांना केंद्रांतील आपले स्थान अधिक भक्कम करायचे आहे.

महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत महाराष्ट्रातील 288 आमदारापैंकी एका रज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. विधानसभेतील सध्याचे चित्र पाहिल्यास भाजपचे 105 आमदार आहेत. तर शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. सध्या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सातव्या जागेवर शरद पवार हक्क सांगतिल असे बोलले जात आहे.