काँग्रेस शिवसेनेवर कमालीचं ‘नाराज’, संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेत शिवसेनेने नागरिकत्व सुधारणा विधेयकाला समर्थन दिले. त्यानंतर काँग्रेस शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली. महाराष्ट्रात हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आहेत, लोकसभेतील शिवसेनेच्या भूमिकेचा राज्यातील सत्तेवर परिणाम होईल असे बोलले जात आहे. परंतु यावर भाष्य करताना शिवसेनेचे नेते संजय राऊत त्यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, याचा कोणताही परिणाम राज्यातील सत्तेवर होणार नाही. शिवसेना कधीही दबावतंत्राला घाबरत नाही.

संजय राऊत म्हणाले की, राज्यातील सरकार धार्मिक अधिष्ठानावर नाही तर किमान समान कार्यक्रमावर सुरु आहे. राष्ट्रीय प्रश्नाचा राज्यातील मुद्यांवर परिणाम होणार नाही. आम्ही यूपीएमध्ये नाही. भाजप सोबत असताना देखील आमची वेगळी मते असायची असे ही ते सांगायला विसरले नाहीत.

संजय राऊत पुढे म्हणाले की, लहान पक्षांना अमिष दाखवून दडपशाहीचा उपयोग करुन विधेयक मंजूर करुन घेतले गेले. मागील काही दिवस शिवसेनेला राष्ट्रवाद शिकवण्याचा प्रयत्न केला गेला. हिंदुत्व शिकवलं. आम्हाला कोणाकडून ही हिंदुत्व आणि राष्ट्रवाद उसणं घेण्याची गरज नाही. हिंदुत्व स्वीकारणं किंवा हिंदु असणं म्हणजे भाजपची गुलामी स्वीकारणं असे होत नाही. ज्याला सेक्युलर जगायचंय त्यांना काँग्रेसची गुलामी स्वीकारण्याची गरज नाही.

संजय राऊत या वेळी म्हणाले की, नागरिकत्व सुधारणा विधेयक जे आले, मग त्याला पाठिंबा देणारे राष्ट्रभक्त, जे पाठिंबा देणार नाहीत ते राष्ट्रद्रोही, कोण पाकिस्तानची भाषा बोलतो हे तुम्ही ठरविणारे कोण? नवाब शरीफांच्या वाढदिवसाला केक कापायला कोण गेले होते? हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही हिंदुत्व घेऊन फिरत आहेत, ते बाळासाहेबांनी केलं आहे. त्यामुळेच तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात, त्याचे हेडमास्तर आम्ही आहोत. बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तेच केले आहे.

नागरिकत्व विधेयकावर बोलताना संजय राऊतांनी टीकास्त्र डागले. ते म्हणाले की, शिवसेनेने भूमिका बदलली नाही, जे प्रश्न लोकसभेत विचारले होते तेच प्रश्न राज्यसभेत विचारले. आमच्या प्रश्नाला उत्तरे दिली नाही. हिंदू शरणार्थींना आश्रय देऊ नका असे आम्ही कधीच म्हणलो नाही. आजूबाजूच्या देशात अल्पसंख्यांक म्हणून हिंदूंवर अत्याचार होता आहेत, हे सत्य आहे. या लोकांना नागरिकत्व देण्यास अडचण नाही, परंतु किती प्रमाणात देणार ? या लोकांना कोणत्या राज्यात ठेवणार ?

मतदानाच्या अधिकारावर बोलताना संजय राऊतांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले. ते म्हणाले, ईशान्येकडील राज्यात जो काही उद्रेक सुरु आहे तो कशासाठी ? श्रीलंकेत तमिळ बांधव आहेत ते सुद्धा याच यातना भोगत आहेत. जे येतील त्यांना 25 वर्ष मतदानाचा अधिकार देऊ नका असे आम्ही सांगितले. त्यांनी आश्रय मागितला, मतदानाचा अधिकार नाही. बेरोजगारी, महागाई, आर्थिक व्यवस्था कोलमडली यावरुन लक्ष हटविण्यासाठी हे सुरु आहे. ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय?

दडपशाही असल्याचे सांगत ते म्हणाले की, बाहेरच्या लोकांनी येऊन आमच्या देशाचे आणि राज्याचे भवितव्य ठरवू नये ही भूमिका आमची होती. मी बोलताना माईकचा आवाज बंद करण्यात आला, ही दडपशाही आहे. संसदीय लोकशाही आणीबाणी आणण्याचा प्रयत्न कराल तर तसं होणार नाही. सगळ्या यंत्रणा त्यांच्याकडे असल्याने विधेयक तर पास होणार होतं असे सांगत संजय राऊंतांनी भाजपला लक्ष केलं.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/