‘एनडीए’च्या बैठकीला ‘शिवसेनेला’ निमंत्रण नाही, युती तुटल्याचे ‘संकेत’ ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होण्याआधीच दिल्लीत राज्यातील सत्तापेचामुळे भाजप आणि शिवसेनेतील बेबनाव उफाळून आला. युती तुटल्याची घोषणा न करणाऱ्या शिवसेनेच्या केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे एनडीएतून शिवसेना बाहेर पडल्याचे संकेत दिले गेले. आता यावर भाजपने देखील एनडीएच्या घटक पक्षांच्या बैठकीचे शिवसेनेला निमंत्रण न देता अघोषित शिक्कामोर्तब केले.

संसदेचे हिवाळी अधिवेश सोमवारपासून म्हणजेच 18 नोव्हेंबर पासून सुरु होईल. त्याआधी एनडीएच्या घटकपक्षांची बैठक होते. भाजपकडून शिवसेना, शिरोमणी अकाली दल, संयुक्त जनता दल, अपना दल, लोकजनशक्ती पक्ष यांना बैठकीचे निमंत्रण पाठवले जाते. ही बैठक अनौपचारिक असली तरी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची असते. कारण या बैठकीत अधिवेशनातील रणनिती, विविध विषय, परस्पर सामंजस्य, सहमतीवर व इतर विषयांवर चर्चा होते. परंतू गेल्या तीस वर्षात पहिल्यांदाच शिवसेनेला अद्याप तरी बैठकीचे निमंत्रण देण्यात आलेले नाही.

एनडीएकडून अजूनही बैठकीचे आमंत्रण आलेले नाही असे शिवसेनेचे गटनेते खासदार विनायक राऊत यांच्याकडून सांगण्यात आले. युती तुटल्याची अजून तरी घोषणा झाली नाही. 2 दिवसांपूर्वीच्या अमित शाह यांच्या मुलाखतीनंतर संजय राऊतांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे. त्यामुळे आता जर भाजपकडून शिवसेनेला बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले नाही तर युती तुटली असे समजायचे का असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो.

Visit : Policenama.com