पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्यावतीने रावसाहेब दानवेंच्या प्रतिमेला जोडे मारुन निषेध

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीत कृषी कायद्याच्याविरोधत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल (Farmer Protest) भाजपचे (BJP) नेते रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी काही दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान केले होते. याचे पडसाद आज पिंपरी चिंचवड शहरात उमटल्याचे पहायला मिळाले. पिंपरी चिंचवड शिवसेनेच्या (Shivsena) वतीने भोसरी येथे रावसाहेब दानवे यांच्या प्रतीमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. तसेच शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी जिल्हासंघटिका सुलभा उबाळे (Sulbha Ubale), विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

गेल्या काही दिवसांपासून दिल्लीमध्ये हरियाणा आणि पंजाब येथील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. सरकारने अद्याप त्यांच्या मागण्या मान्य केल्या नसून आंदोलनाला अनेकांची साथ मिळत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांचा आणि विविध संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत अनेक नेत्यांनी धक्कादायक विधाने केली आहेत. तसेच या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

काय म्हणाले होते दानवे ?

शेतकरी आंदोलनामागे देशाबाहेरील षडयंत्र असून चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा दानवे यांनी केला. हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही असेही ते म्हणाले होते. हे आंदोलन चालू आहे मात्र हे शेतकऱ्यांचे आंदोलन नाही. या आंदोलनाच्या पाठिमागे चीन आणि पाकिस्तानचा हात आहे. या देशामध्ये पहिल्यांदा मुस्लीम समाजाला उचकवलं आणि सांगितलं सीएए आणि एनआरसीमुळे मुस्लिमांना देशातून बाहेर जावं लागेल. एकला तरी बाहेर जावं लागलं का ? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला.