‘या’ कारणामुळं शिवसेनेचं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेबाहेर ‘आंदोलन’

नवी दिल्ली : वृत्त संस्था – एनडीएमधून बाहेर पडल्यानंतर संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शिवसेनेच्या खासदारांनी सोमवारी संसदेच्या पहिल्याच दिवशी आंदोलन केले.

संसदेचे सभापती ज्या दरवाज्यातून आत प्रवेश करतात, त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार एकत्र आले व त्यांनी फलक झळकावून घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर २५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या खासदारांनी केली.

महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेवरुन शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतली आहे. केंद्रीय मंत्रीमंडळातील राज्यमंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला. त्यानंतर संसद अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला एनडीए मधून शिवसेनेला काढून टाकल्याची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर आता शिवसेना संसदेत कोणती भूमिका घेणार याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष असतानाच सोमवारी सकाळीच शिवसेनेने आपला विरोध दाखवून देताना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन आंदोलन करुन आपली भूमिका दाखवून दिली आहे.

Visit : Policenama.com