राज ठाकरेंच्या मागणीमागे नक्की महसुलाचाच विचार आहे ना ?; शिवसेनेचा ‘सवाल’

पोलीसनामा ऑनलाइन टीम  – राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज असून, नियमांचे पालन करून मद्यविक्रीलाही परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली होती. त्यावरुन आता शिवसेनेने राज ठाकरे यांनी ही जी मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना ? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली ? असे शिवसेनेने त्यांच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सामनाच्या संपादकीयमधून त्यांच्या मागणीवर भाष्य केले आहे.

राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दु:ख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर आहे. कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठ्या वर्गाची तडफड सुरू आहे. अशा सर्व तगमगणार्‍या जीवांचे दु:ख कलावंत मनाच्या राज ठाकरे यांनी सरकारदरबारी मांडले आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनांची खदखद व्यक्त करून राज यांनी मोठेच उपकार केले आहेत.

गेले 35 दिवस महाराष्ट्रातील उपाहारगृहे, पोळीभाजी केंद्रे बंद आहेत. ही पोळीभाजी केंद्रे, उपाहारगृहेसुद्धा सुरू व्हावीत. तसेच राज्य चालविण्यासाठी महसुलाची गरज लक्षात घेऊन नियमांचे पालन करून मद्यविक्रीला परवानगी देण्याचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मागणीमुळे घरोघरच्या रिकाम्या बाटल्या, प्यालेही फसफसू लागले आहेत. राज ठाकरे यांच्या मागणीत दम आहे व त्यांनी अनेक जिवांच्या कोरड्या घशांची काळजी घेणारी मागणी केली आहे.

त्यामुळे हे ‘कोरडवाहू’ श्रमिक लोक राज ठाकरे यांची ‘तळी’ उचलून धरतील याबाबत आमच्या मनात शंका नाही, पण ही मागणी करून दोन शंका लोकांच्या मनात निर्माण केल्या. राज ठाकरे यांनी ही जी रंगीत-संगीत मागणी केली त्यामागे नक्की राज्याच्या महसुलाचाच विचार आहे ना? की ‘तळीरामां’च्या कोरड्या घशाच्या चिंतेतून मनसेप्रमुखांनी ही फेसाळणारी मागणी केली? महाराष्ट्राचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी ही मागणी असली तरी एक समस्या आहेच. कारण ‘लॉकडाऊन’मुळे ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे फक्त ‘वाइन शॉप’च बंद आहेत असे नाही तर राज्यातील मद्यनिर्मिती करणारे कारखानेही बंद पडले आहेत. त्यामुळे आधी हे कारखाने सुरू करावे लागतील तेव्हाच त्यांचा माल वाईन शॉपपर्यंत पोहोचेल. केवळ दुकाने सुरू होऊन दारूचा महसूल मिळत नसतो.