‘मरकज’मुळे हिंदू-मुसलमान खेळ करणार्‍यांच्या हाती आयते ‘कोलीत’ : शिवसेना

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढत असताना ‘मरकज’सारखे काही घडवले जाते आणि या सर्व प्रयत्नांवर पाणी पडते. दिल्लीतील ‘मरकज’ने हिंदू-मुसलमान असा खेळ करणार्‍यांना आयतेच कोलीत दिले आहे. येथील अज्ञानी मुसलमानांनी निदान ‘मक्का-मदिने’कडून तरी काही शहाणपण घ्यावे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या आदेशाने ‘लॉक डाऊन’ झाले आहे. संपूर्ण देशात कोरोनाच्या भीतीने नागरिक घरात बसले आहेत. पण दिल्लीच्या निजामुद्दीन येथे जमलेल्या मुसलमान झुंडीने देशावरील संकटात आणि चिंतेत भर टाकली आहे. सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेने या प्रकारावर निशाणा साधला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन भागात तबलीगी समाजाचा ‘मरकज’ नावाचा धार्मिक कार्यक्रम 1 ते 15 मार्चच्या दरम्यान झाला.

या कार्यक्रमासाठी देशातील 22 राज्यांमधून आणि जगातील 8 देशांतून 5 हजारांवर लोक जमले होते. त्यातील 380 लोक आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने देशात हडकंप माजला आहे. या 5 हजारांच्या जमावात 2 हजार परदेशी नागरिक होते. सारा देश कोरोनाच्या चिंतेने ग्रासला असताना, दिल्लीसारख्या शहरात ‘गर्दी’ आणि ‘झुंडी’ जमा करण्यावर निर्बंध लादलेले असताना 5 हजार लोक धर्माच्या नावाखाली जमले त्यामुळे त्याचा व्हायचा तोच परिणाम अखेर झाला. निजामुद्दीन परिसरात जमलेल्या या धार्मिक झुंडीने देशाला 380 कोरोनाग्रस्तांचा ‘नजराणा’ पेश केला आहे. हा सर्व प्रकार म्हणजे अक्षम्य बेफिकीरी व धर्मांध मस्तवालपणाचा नमुना आहे.

‘मरकज’निमित्ताने जे लोक तेथे जमले त्यांनी राष्ट्राची व समाजाची अशी काय सेवा केली? किंबहुना नुकसानच केले. एका बाजूला देशातील सर्वच धार्मिक स्थळे गर्दी टाळण्यासाठी बंद केली असताना ‘इस्लाम’च्या नावाखाली इतके लोक जमणे हे अमानुष आहे. दुबई, कुवैत, बहरीन, सौदी अरब अशा देशांमध्येही मशिदी बंद केल्या आहेत. लोकांनी घरच्या घरीच नमाज पठण करावे असे फर्मान तेथील राज्यकर्त्यांनी काढले आहे. तेदेखील मुसलमानच आहेत आणि इस्लामचे बंदे आहेत. तेथे राष्ट्रीय व सामाजिक सुरक्षेसाठी मशिदी व सार्वजनिक नमाजावर बंदी येऊनही ‘इस्लाम’ संकटात आल्याची बांग कोणी ठोकलेली नाही, पण दिल्लीत ‘मरकज’ची यात्रा घडली नसती तर धर्मावर काय मोठे आकाश कोसळले असते?