गुणपत्रिकेवर ‘कोविड प्रमोटेड’ शिक्का मारणे विकृतीच : शिवसेना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यावरून राज्य सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यातील वाद विकोपास गेला आहे. अशातच राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड 19’ असा उल्लेख करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावरून आता शिवसेनेने टीका करत विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कोविड प्रमोटेड’ शिक्का मारण्याचा विचार ही विकृतीच असल्याचे म्हटले आहे.

सडक्या विचाराचे ‘विषाणू’ कृषी विद्यापीठांच्या डोक्यात शिरले कसे ? की हे ‘विषाणू’ सोडणारे कोणी भलतेच आहेत? विद्यार्थी हा कोणाच्याही स्वार्थी राजकारणाचे ‘साधन’ होऊ नये, मग ती पदवीची अंतिम परीक्षा असो किंवा कृषी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांवर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का मारण्याचा विचार. चांगले काही करता येत नसेल तर वाईट तरी करू नका. हे नसते उपद्व्याप थांबवा, असे सामनाच्या संपादकीयमधून याप्रकरणावर भाष्य केले आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात अशी ‘जाणीवपूर्वक’ अस्थिरता निर्माण करण्याचे उद्योग लपून राहिलेले नाहीत. पदवीच्या अंतिम परीक्षेबाबत घातला जात असलेला घोळ हा असाच जाणीवपूर्वक आणि ‘नसता’ या श्रेणीतला आहे.

आता शिक्षणाशीच संबंधित आणखी एक ‘नसता’ प्रकार उघड झाला आहे. हा नसता उपद्व्याप करण्याचा प्रयत्न केला होता राज्यातील कृषी विद्यापीठांनी. कोरोनामुळे परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱया कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-19’ असा शिक्का मारण्याची तयारी कृषी विद्यापीठांनी चालवली होती. बी.एस्सी. (कृषी) अभ्यासक्रमाच्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांबाबत हा प्रकार होणार होता. मात्र कृषी विद्यापीठांचा हा उपद्व्याप उघड झाला आणि राज्याच्या कृषिमंत्र्यांनी तातडीने त्यासंदर्भात दखल घेत कडक पावले उचलली. त्यामुळे आता कृषी विद्यापीठांनी गुणपत्रिकांवरील ‘प्रमोटेड कोविड-19’ हा उल्लेख वगळण्याचा निर्णय घेतला आहे. मुळात ही गोष्ट करण्याची गरजच काय होती? अशी विचारणा शिवसेनेने केली आहे.