चंद्रकांत पाटील यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर शिवसेनेचा भाजपवर ‘निशाणा’

पोलिसनामा ऑनलाईन – काँग्रेसमध्ये मोठे राजकीय भूकंप होतील असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावरून आता शिवसेनेने त्यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, बावनकुळे, विनोद तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्यांच्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे. असे म्हणत शिवसेनेने विरोधकांवर सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे

‘महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षात लवकरच भूकंप होईल. राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल.’ चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. त्यासाठी त्यांनी पुन्हा एखादा लंगोट कसून मैदानात उतरायचा प्रयत्न जरूर करून पाहावा. पाच महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस फोडून सरकार बनविण्याचा प्रयोग फसला. आता काँग्रेसमध्ये भूकंप घडवून महाराष्ट्रात उलथापालथ करायची असेल तर त्यांना कोण रोखणार? सर्व स्थिरस्थावर झाले की, पाटलांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे.

पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीतला अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे. विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल. सरकारचे काही चुकत असेल तर प्रश्न विचारायचा पूर्ण अधिकार विरोधकांना आहे. 105 चा भक्कम आकडा असतानाही त्यांना सत्ता राखता आली नाही. त्यांच्या जागी दुसरे कोणी असते तरी त्यांच्याही मनाची अशीच तळमळ व शरीराची लाहीलाही झाली असती. सध्या खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींचीही अस्वस्थ तगमग, तळमळ सुरूच आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे, असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.