रघुराम राजन यांना खोटे ठरविले जाईल, शिवसेनेची टीका

पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउन वाढवल्यास गंभीर परिणाम आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी रघुराम राजन यांनी सरकारला काही उपायही सुचवले होते. परंतु रघुराम हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे ठरविले जाईल, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची दोन दिवसांपूर्वी मुलाखत घेतली होती. त्यावेळी राजन यांनी देशातील आर्थिक परिस्थिती आणि लॉकडाउनमुळे त्यावर होणारा परिणाम यावर भाष्य केले होते. कोरोनामुळे भारतात किमान 10 कोटी लोकांना रोजगार गमवावा लागेल असा अंदाज व्यक्त केला होता. पण रघुराम हे दिल्ली सरकारधार्जिणे नसल्याने त्यांना पद्धतशीर खोटे पाडले जाईल व सर्व काही आलबेल आहे, असे ढोलताशे वाजवले जातील. त्याने परिस्थिती बदलणार आहे काय ? असे म्हणत शिवसेनेने केंद्रावर निशाणा साधला आहे. सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर टीका केली आहे.

कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउन अवस्थेत गोरगरीब भरडला गेला आहे. त्याचे भविष्य अधांतरी आहे. गोरगरीबांना मदत करण्यासाठी सरकारने 65 हजार कोटी रुपये खर्च करणे आवश्यक असल्याचे मत रघुराम राजन यांनी मांडले आहे. राहुल गांधी हे विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत. ते संसदेचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांचे मत, त्यांनी केलेल्या चर्चा याची खिल्ली उडवता येणार नाही. लॉकडाउनमुळे देशावर आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. त्यात सगळ्यात हाल होणार आहेत ते गोरगरीबांचे असे रघुराम राजन म्हणतात. मुळात आज जी गरिबीची सरकारी व्याख्या आहे ती लॉकडाउननंतर बदलणार आहे.

कोरोनामुळे अमेरिकेसारख्या संपन्न देशात बेरोजगारीचे संकट कोसळले आहे. गेल्या एक महिन्यात सव्वाचार कोटीइतक्या नव्या बेरोजगारांची नोंदणी तेथे झाली आहे. सगळ्यांची व्यवस्था आता सरकारला करावी लागेल. अमेरिकेत बेरोजगार भत्त्याची सोय आहे, तशी व्यवस्था आपल्या देशात नाही, पण अमेरिकेस मागे टाकणार्‍या बेरोजगारांच्या रांगा आपल्याकडेही लागतील व रघुराम सांगतात ते 65 हजार कोटी पाचोळ्यासारखे उडून जातील. असा दाखला देण्यात आला आहे.