चीनी वटवाघुळांच्या प्रेमात पडायचे कशाला ?, रॅपिड टेस्टिंग कीटवरून शिवसेनेचा केंद्रावर ‘निशाणा’

पोलीसनामा ऑनलाइन – केंद्र सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला दिली, त्या किट्सची पहिली खेप बिनकामाची निघाली. शेवटी चिनी माल भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या आहेत. सध्याच्या बोगस कीट्सऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्स वापरा!’ म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला? असे म्हणत शिवसेनेनं रॅपिड टेस्टिंग कीटवरून सरकारवर निशाणा साधला आहे.

भारतासारखे राष्ट्र चीनकडून कोरोना विषाणूच्या रॅपिड टेस्ट कीट मोठया प्रमाणात घेत आहे. त्यामुळे एकप्रकारे चीनच्या अर्थव्यवस्थेस मजबुती देणारे काम करीत आहे. पण चिनी मालाची अवस्था ही चले तो चांद तक, नहीं तो रात तक’ अशीच असते. त्यामुळेच चीनकडून खरेदी केलेले लाखो रॅपिड टेस्ट कीट भंगारात टाकून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे. त्यामुळे शिवसेनेने रॅपिड टेस्टिंग कीटवरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. सामनाच्या संपादकीयमधून सरकारवर टीका केली आहे. महाराष्ट्राला केंद्राकडून 75 हजार रॅपिड टेस्टचा चिनी प्रसाद मिळाला आहे.

धारावीसारख्या कोरोना हॉट स्पॉट’ भागात रॅपिड टेस्टचे काम सुरू झाले, पण मुंबई महापालिका प्रशासनाने या रॅपिड टेस्ट तत्काळ थांबवायला सांगितल्या. कारण चिनी माल नेहमीप्रमाणे भंगार निघाला व कोरोनाचा बाजार करून चीनने भारताच्या गळयात टाकावू माल मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून रॅपिड टेस्ट कीटबाबत तक्रारी येऊ लागल्या. हा सर्व गोंधळ कोरोनाबाबतची चिंता वाढवणारा आहे. या लढाईत आपण कसे गंभीर नाहीत व इतके होऊनही निर्णयात कशी एकवाक्यता नाही हे दाखवणारा हा गोंधळ आहे. ज्या चीनवर भरवसा ठेवता येत नाही व ज्या चीनने जगाला महामारीच्या संकटात ढकलले त्याच्याशी त्याच व्हायरस’शी लढण्यासाठी हातमिळवणी करावी हे धक्कादायक असल्याचे नमूद केले आहे.