Lockdown : घरात बसा म्हणणार्‍यांना मजुरांचं दुःख काय कळणार ? : शिवसेना

पोलीसनामा ऑनलाइन – लॉकडाउनमुळे उद्योग धंदे बंद असल्याने परप्रांतीय कामगारांनी गावी जाऊ देण्याची मागणी केली आहे. काही मजूर शेकडो मैलांची पायपीट करीत आपापल्या गावी निघाले व पोहोचले. त्यातील काहीजण घरी पोहोचण्याआधीच अपघात किंवा अतिश्रमाने मरण पावल्याचे प्रकार घडले आहेत. आहात तेथेच थांबा, सुरक्षित राहा असे आवाहन जे करतात ते आपापल्या घरी सुरक्षित राहून असे आवाहन करीत असतात. त्यांना या मजुरांचे दु:ख, पायपिटीच्या यातना कशा समजणार? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

परप्रांतीयांना महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून घरी पोहोचायची घाई झाली आहे. अर्थात, त्यांना बाहेर पडू न देणे हे आरोग्याच्यादृष्टीने सोयीचे आहे, पण त्यांचे काफिले झुंडीच्या झुंडीने निघणारच असतील तर केंद्र सरकारला अशा लोकांची जबाबदारी झटकता येणार नाही. गाड्या सोडा, बसेस लावा, पण त्यांची जाण्याची व्यवस्था करा. कारण या मंडळींचा ‘होमसिक’नेस संपला नाही तर हे सर्व लोक रस्त्यावर उतरून काय हैदोस घालतील याचा नेम नाही, सामनाच्या संपादकीयमधून या प्रकरणावर टीका केली आहे. मुंबईसह महाराष्ट्राच्या विविध भागांत परप्रांतीय मजूर अडकले आहेत. त्यांना आपापल्या गावी जायचे आहे. गावी जाण्यासाठी ते धडपडत आहेत व नसते उपद्व्यापही करत आहेत, पण नितीन गडकरी यांनी एक सवाल फार महत्त्वाचा केला आहे. ते विचारतात, परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे, पण त्यांच्या गावी जाऊन ते खाणार काय? साधारण आठ राज्यांचे मजूर महाराष्ट्राच्या विविध भागांत अडकून पडले आहेत. हा आकडा कोणी साडेतीन लाख सांगतात, तर कोणी पाच लाखांवर सांगत आहेत. काही मजूर शेकडो मैलांची पायपीट करीत आपापल्या गावी निघाले व पोहोचले. त्यातील काहीजण घरी पोहोचण्याआधीच अपघात किंवा अतिश्रमाने मरण पावल्याचे प्रकार क्लेशदायक आहेत. आहात तेथेच थांबा, सुरक्षित राहा असे आवाहन जे करतात ते आपापल्या घरी सुरक्षित राहून असे आवाहन करीत असतात. त्यांना या मजुरांचे दु:ख, पायपिटीच्या यातना कशा समजणार? हाताला काम नाही, राहायला निवारा नाही. पुन्हा कुटुंब कुठे तरी लांब. त्यांच्या आठवणीने जीव व्याकुळ होणे स्वाभाविक आहे. या ओढीने पाय शेकडो मैल पायपीट करण्यास तयार होतात. हे देशभरातील मजुरांचे हाल आहेत. काम बंद आहे म्हणून हातात पैसा नाही आणि पैसा नाही म्हणून कुटुंबाचा चरितार्थ कसा करायचा, चूल कशी पेटवायची हा प्रश्न हातावर पोट असलेल्या मजुरांच्या समोर आज उभा आहे.