‘हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला आणलं गुडघ्यावर’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – तीन कृषी कायद्यावरून गेल्या काही दिवसांपासून देशात रणकंदन सुरू आहे. या कायद्याच्या विरोधात शेतकरी एकवटले आहेत. दिल्लीत शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले आहे. गुरुवारी तीन कृषी कायद्यांमध्ये आठ दुरुस्त्या करण्याबाबत विचार होऊ शकतो, अशी तडजोडीची भूमिका केंद्र सरकारने घेतली. मात्र, तिन्ही कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्दच करावेत, या मागणीवर शेतकरी ठाम राहिल्याने विज्ञान भवनात आठ तास चाललेली बैठक निष्फळ ठरली. दरम्यान, हाच मुद्दा उचलत शिवसेनेने मुखपत्र असलेल्या सामनातून हम करे सो कायदा चालणार नाही, शेतकऱ्यांनी केंद्राला गुडघ्यावर आणलं असं म्हणत केंद्रावर निशाणा साधला. मोदी सरकारचे तीन वादग्रस्त कृषी कायदे रद्द करा, अशी शेतक-यांची मागणी आहे. सरकारने आंदोलक शेतकरी नेत्यांना चर्चेसाठी बोलावले व कृषी कायदे कसे साखरेच्या पाकात घोळून बाहेर काढले आहेत, त्याचे प्रात्यक्षिक दाखवले, पण शेतकरी नेते काहीही ऐकायला तयार नाहीत. त्यांनी सरकारचे चहा-पाणी न पिताच बैठकीतून निघून गेले, अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून केंद्र सरकारचा समाचार घेतला.

काय म्हटलंय अग्रलेखात ?
मोदी सरकारने नोटबंदी लादली तीही यशस्वी झाली, जीएसटीने केलेला सत्यानाश पचवला. बेरोजगारी, महागाईवर हिंदू-मुसलमान वाद, हिंदुस्थान-पाकिस्तानचा उपाय दिला. लॉकडाउनमुळे जेरीस आलेल्या जनतेला आयोध्येचे राम मंदिर दाखवले. पण पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर मोदी सरकारचे कोणतेही लॉलिपॉप चाललेलं नाही. हे पंजाबच्या एकीत आहे.

भाजपच्या सायबर फौजांनी शेतकऱ्यांच्या एकजुटीत फूट पाडण्याचे प्रयत्न केले. राहुल गांधी यांनी ट्विटरवर हरयाणा सीमेवर वृद्ध शेतकऱ्यांना पोलीस चोपत असल्याचे चित्र टाकताच भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधी हे खोटारडे असल्याचा कांगावा केला. ‘हिंदुस्थानातील सर्वांत बदनाम विरोधी पक्षनेत्यांपैकी एक’ अशी राहुल गांधींची संभावना करताच ट्विटरने शेतकऱ्यांना पोलीस मारत असल्याचा व्हिडिओच प्रसिद्ध करत मालवीय यांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली, त्यामुळे भाजपचा आयटी सेल तोंडावर पडला.

शेतकरी आंदोलन उग्र रूप धारण करणार हे लक्षात येताच अमित शाह यांनी पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर यांना चर्चेतून तोडगा निघावा यासाठी दिल्लीत पाचारण केले. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनातील आम्ही एकजुटीचा वारंवार उल्लेख करतो. कारण एकजूट हेच मोठे यश आहे. पंजाबातील सर्व गायक, कलावंत, खेळाडू यांनी त्यांचे राष्ट्रीय पुरस्कार केंद्राला परत करायचे ठरवले आहे व भाजपवाले खिल्ली उडवतात, तशी ही काही पुरस्कार वापसी गँग नाही. पद्मश्री, पद्मभूषण, अर्जुन पुरस्कार परत करून ही मंडळी शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत आहेत.

कडाक्याच्या थंडीतही मोदी सरकारला पंजाबच्या शेतकऱ्यांनी घाम फोडला आहे. आंदोलन मागे घ्यायचे सोडाच, पण ते अधिक जहाल आणि तीव्र होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा, बदनाम करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे सर्व डावपेच मोदी सरकारच्या अंगलट आले. गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारची अशी कोंडी झालेली कधीही पहिली नाही. पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शाह यांच्या एका हातात जादूची छडी व दुसऱ्या हातात चाबूक आहे, ते कोणालाही झुकवू शकतात हा गैरसमज पंजाबच्या शेतकऱ्यांनी खोटा ठरवला आहे, असेही या अग्रलेखात म्हटले आहे.