मोदीजी ‘कुछ तो गडबड है’ : शिवसेना

पोलीसनामा ऑनलाईन टीम – भारत चीन सीमेवर तणावाचे वातावरण असतानाच राजकारणही सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगत आहेत. यावरून आता शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपाला टोला लगावला आहे. संकट कितीही मोठे असले तरी भारताचे संस्कार हे निःस्वार्थ भावाने सेवा करण्याची प्रेरणा देतात असे मोदी सांगतात. तेव्हा त्यांच्या भक्तांनी विरोधकांकडे डोळे वटारून पाहण्याची गरज नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे.

मोदी चीनविषयी बोलतात आणि त्यांचे लोक विरोधकांकडे वाकड्या नजरेने पाहतात. कुछ तो गडबड है! कोरोनाप्रमाणे ‘ट्यून’ येथेही बदलायलाच हवी, असे म्हणच शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून सत्ताधार्‍यांना टोला लगावला आहे. ‘कोरोना व्हायरसशी आज संपूर्ण देश लढत आहे. पण लक्षात ठेवा, आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही!’ जसा या ट्यूनचा लोकांना कंटाळा आला आहे तसा चीनप्रकरणी भाजप आणि काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या ट्यून युद्धाचाही कंटाळा आला आहे. ‘आपल्याला चीनशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही’ अशी एक कॉलर ट्यून कोणीतरी दिल्लीत सतत वाजवायला हवी. सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत. त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार पक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत बसला आहे. राजीव गांधी फाऊंडेशनला चीनकडून निधी मिळाला. चीन व काँग्रेसचे नाते काय? असे प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले. यावर काँग्रेसने प्रतिटोले मारले.

पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत व सध्याचे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यातही चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. म्हणजे आम्ही म्हणतोय तो मुद्दा हाच आहे. चीन सीमेवर चौक्या आणि बंकर्स उभे करीत आहे आणि देशात भाजप विरुद्ध काँग्रेस असे युद्ध रोज सुरू आहे.