‘मिलिंद देवरा, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या सक्रिय अध्यक्षांची मागणी करणं म्हणजे गमंतच’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – काँग्रेस पक्षाला उभारी देण्यासंदर्भात देशातील 23 नेत्यांनी पत्र लिहून अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणी केली होती. त्यांनंतर हा पत्राचा मुद्दा काँग्रेसच्या कार्यसमितीच्या बैठकीतही गाजला होता. यावरून आता शिवसेनेने काँग्रेसच्या या नेत्यांवर निशाणा साधला आहे. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावे? या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते, असे म्हणत शिवसेनेने त्यांना टोला लगावला आहे. सामनाच्या संपादकीयमधून काँग्रेसच्या या नेत्यांवर टीका केली आहे.

राहुल गांधी हे सक्रिय असून त्यांनी एकाकीपणे मोदी-शहांना अंगावर घेतले. विधानसभा निवडणुकांत त्यांनी देश पालथा घातला. भाजपकडून त्यांच्यावर कमरेखालचे हल्ले झाले तेव्हा हे सक्रिय ‘पत्र पुढारी’ कुठे होते? राहुल गांधी यांचे खच्चीकरण मोदी-शहांच्या भाजपने केले नसेल तेवढे पक्षांतर्गत जुन्या कोंडाळयाने केले आहे. काँग्रेसच्या 23 प्रमुख नेत्यांच्या पत्राने निर्माण केलेले वादळ तूर्त थडांवले आहे असे दिसते. मुळात पक्षात वादळ निर्माण करण्याची क्षमता काँग्रेस पक्षातील एखाद्या नेत्यात तरी उरली आहे काय? काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी करणारे एक पत्र जुन्या काँग्रेस पुढार्‍यांनी सोनिया गांधी यांना लिहिले.

ज्यांनी हे पत्र लिहिले, त्या सर्व नेत्यांनी वयाची सत्तरी ओलांडली आहे. त्यापैकी एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरदेखील लोकांचा नेता नाही. तरीही यापैकी अनेक नेत्यांनी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या आहेत.

पी. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत, पण ते नेते कधी झाले? राजीव गांधींशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडली होती व तामीळनाडूत स्वतःचा पक्षही काढला होता, पण लोकांचे समर्थनच नसल्याने त्यांना हा पक्ष गुंडाळावा लागला. गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल, आनंद शर्मा हे जुनेजाणते नेते आहेत. शर्मा यांनी तरुणपणात काँग्रेससाठी खस्ता खाल्ल्या तशा आझाद यांनीही खाल्ल्या. कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे सांभाळली, पण या घडीस राजकारणातील त्यांची सद्दी संपली असल्याची अशी टीका शिवसेनेने केली आहे.