‘कलम 370’ – ‘सर्जिकल स्ट्राइक’ योग्यच, पण जवानांचे मृत्यू का थांबत नाहीत ?, शिवसेनेचा ‘सवाल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेनेने काश्मीर प्रश्नावरून मोदी सरकारला घेरण्याच्या प्रयत्न केला आहे. नौशेरा चकमकीत महाराष्ट्रातील एक जवान शहीद झाला आहे. जवान शहीद होण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याने, या जवानांच्या शहीद होण्यावरून शिवसेनेने मोदी सरकारवर हल्ला केला आहे. तसेच सरकारच्या काश्मीर नितीवर प्रश्न उपस्थित केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटले आहे की, एका महिन्यात महाराष्ट्रातील सात-आठ जवान शहीद झाले आहेत. यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी जबाबदार नाही. हे सरकारला समजले पाहिजे. सतत सांगितले जात आहे की, जम्मू-काश्मीरची परिस्थिती नियंत्रणात आहे, पण यात किती सत्य आहे ?

सामनात म्हटले आहे की, कलम -370 हटविणे चांगलेच आहे. यापूर्वी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक झाला, पण हे सर्व करूनही काश्मिरच्या परिस्थितीत बदल झाला आहे का ? दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. परंतु, त्याच्या बातम्या देण्यावर नियंत्रण आहे. बंदूकांचा आवाज थांबलेला नाही. केवळ या आवाजाला आनंदाचा जल्लोष म्हटले जात आहे. काश्मिरात दूरध्वनी सुविधा सुरू झालेली नाही. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून एसएमएस सेवा सुरू करण्यात आली आहे. परंतु, इंटरनेट सेवा अजूनही बंद आहे.

370 हटविल्यानंतर काश्मीरमध्ये काय सुरू आहे ?
सामनात म्हटले आहे की, 5 ऑगस्टला कलम -370 रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये काय सुरू आहे, जाणून घेतले पाहिजे. केवळ चकमकीत आपले जवान शहीद झाले एवढीच माहिती मिळते. जवानांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव त्यांच्या गावात पाठविण्याची प्रथा आहे, अन्यथा त्यांच्या शहीद होण्याचे वृत्तसुद्धा लपवून ठेवले गेले असते. नुकतेच कोल्हापूरचे जवान ज्योतिबा चौगुले (वय 37) हे शहीद झाले. महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील सीमेवर शहीद झालेल्या अनेक जवानांचे पार्थिव त्यांच्या गावात पाठविण्यात आल्याच्या आणि लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याच्या बातम्या येत असतात.

सामनात म्हटले आहे की, काश्मीर आणि सीमेचा हा रक्त्पात आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील शहीदांच्या कुटुंबांचा जो आक्रोश आहे, त्यावर किती राजकीय पक्ष आपले मत व्यक्त करत आहेत ? काश्मीर सीमेवर ज्याप्रकारे जवानांचे रक्त वाहत आहे, त्याचा सरळ अर्थ आहे की, काश्मीरमध्ये सर्वकाही ठीक नाही आणि पाकपुरस्कृत दहशतवाद आणि घुसखोरी थांबलेली नाही. तरी सुद्धा सर्जिकल स्ट्राईकचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बालाकोट हल्ल्यात दहशतवाद्यांची ठिकाणे उध्वस्त केल्याच्या माहितीवर देशाचे नागरिक म्हणून आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे, पण या जागी पुन्हा नवीन ठिकाणे तयार झाल्याने भारतविरोधी कारवाईला बळ मिळत आहे, हे सुद्धा नाकारता येणार नाही.

लोकांच्या मनात आक्रोश वाढतोय
शिवसेनेने आपल्या मुखपत्रात लिहिले आहे की, पंतप्रधान मोदी अथवा गृहमंत्री शहा जे बोलतात, ते खरे आहे आणि काश्मीमध्ये भारतीय लष्कर नव्हे, तर पाकिस्तान्यांचे रक्त वाहत आहे. परंतु, अशा बातम्या पसरवून सत्य नाकारता येणार नाही. कारण संदीप सावंत सारख्या जवानांचे तिरंग्यात लपेटलेले पार्थिव गावात पोहोचत आहे आणि लोकांच्या मनात आक्रोश वाढत आहे. काश्मिरातील रक्तपात आणि शहीद जवानांच्या कुटुंबाचा आक्रोश अस्वस्थ करणारा आहे. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी दहशतवाद्यांचे मनोबल खच्ची होईल, हा भ्रम चुकीचा ठरला आहे. उलट आता मोठ्यासंख्येने हल्ले होत आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे डोके ठिकाणावर आणल्याचे म्हणत सरकारने स्व:ताची भरपूर प्रशंसा करून घेतली. परंतु, पाकिस्तानचे वाकडे शेपूट सरळ झाले का? उलट नियंत्रण रेषेवर पाकिस्तान रोज शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे.

प्रत्येक आठवड्यात शस्त्रसंधीचे उल्लंघन
सामनात लिहिले आहे की, कधी पुंछ, कधी राजौरी, तर कधी गस्तीवरील भारतीय सैनिकांवर पाकिस्तानी सेनेकडून हल्ले केले जात आहेत. जम्मू-काश्मीरच्या अनेक भागात आणि सीमावर्ती गावात पाकिस्तानकडून मध्यरात्री अचानक गोळीबार सुरू केला जातो. यामध्ये भारतीय जवान शहीद होतात. नववर्षाच्या पूर्वसंध्येला भारतीय सुभेदार विरेश कुलहट्टी शहीद झाले. काल-परवासुद्धा दोन जवान शहीद झाले. असा एकही आठवडा नाही ज्यामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले नाही आणि भारतीय जवानांचे पार्थिव सीमेवरून त्यांच्या गावात पोहोचले नाही. यावर कुणीही काही बोलत नाही. सामनामध्ये म्हटले आहे की, नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्यानुसार सध्या चीनवर लक्ष ठेवणे जरूरी आहे. त्यांची दिशा योग्यच आहे, परंतु, पाकिस्तानची सीमा आजही आमच्यासाठी रक्तरंजीत होत आहे. काश्मीरमध्ये शांतता नाही आणि चीनच्या सीमेवरही अस्वस्थता आहे. सीमेवरील अस्वस्थता देशासाठी धोकादायक ठरू शकते.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/