भाजपचे ऑक्टोबरपर्यंत सरकार पाडण्याचे मनसुबे : संजय राऊत

पोलिसनामा ऑनलाईन – राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती हा सध्या गरमागरमीचा विषय बनला आहे. त्यांची नेमणूक वेळेत झाली नाही तर ती घटनेची पायमल्ली व स्वातंत्र्याची मुस्कटदाबी ठरेल. आणीबाणीत नेमके हेच झाले होते’ असे म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला आहे, ’ऑक्टोबरपर्यंत राज्यपाल सरकारचे ऐकणार नाही. महाराष्ट्राचे सध्याचे सरकार पडेल ती किंमत मोजून ऑक्टोबरपर्यंत खाली खेचू अशा बाहेर यासाठी पैजा लागल्या आहेत. सामनाच्या रोखठोक सदरातून त्यांनी टीका केली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सद्गृहस्थ आहेत, पण राज्यपालांची नेमणूक गृहखाते करते. त्यामुळे गृहखात्याचे सर्व आदेश त्यांना पाळावे लागतात. याक्षणी देशातील सर्वच शासकीय यंत्रणा राजकारणाने पछाडलेली आहे. महाराष्ट्रात भाजप व अजित पवार गटाचे सरकार यावे व पहाटे घाईघाईने झालेला शपथविधी हे गृहमंत्री अमित शहा यांचे काम असल्याची कबुली फडणवीस यांनीच ताज्या मुलाखतीत दिली आहे.म्हणजे सरकारे पाडायची की ठेवायची याबाबत गृहखात्याचा हस्तक्षेप कायम असतो. गृहखात्याचे काम कायदा-सुव्यवस्था, राष्ट्राची, राज्याची सुरक्षा राखणे हे प्रामुख्याने असते, पण गृहखात्याकडे पोलीस, गुप्तचर, राजभवनाचा ताबा असतो. राजकारणासाठी त्यांचा सर्रास वापर 50 वर्षांपासून सुरूच आहे. त्यामुळे पहाटे पहाटे सरकारचा शपथविधी करून घेणारे राज्यातील नामनियुक्त 12 जागांचे राजकारण नक्कीच करतील व सर्व प्रकरण शेवटी राज्यपालांवर ढकलून नामानिराळे होतील’ असा टोला राऊतांनी राज्यपालांना लगावला.