‘शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला’, देवेंद्र फडणवीसांनी डागली ‘तोफ’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 2014 मध्ये शिवसेनेचा काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव होता हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घ्यावे लागणार असून या निमित्तानं शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी शिवसेनेबाबत केलेलं विधान आमच्यासाठी आश्चर्यकारक आहेच. याशिवाय शिवसेनेचा खरा चेहरा समोर आणणारंही आहे. हे विधान गांभीर्यानं घ्यावं लागेल. यातून शिवसेनेसाठी विचारधारा नव्हे तर केवळ सत्ताच सर्वतोपरी असल्याचं स्पष्ट होतं. यावर शिवसेनेला स्पष्टीकरण द्यावं लागेल.” असं आव्हानंही त्यांनी केलं.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. मुनगंटीवार म्हणाले, “2014 पासून काँग्रेस-शिवसेना आघाडीचे प्रयत्न सुरू होते हा खुलासा धक्कादायक आहे. शिवसेनेचा सत्तामोही चेहरा यामुळे समोर आला आहे. दिवसा आमची सोबत आणि रात्री काँग्रेसशी चर्चा हे शिवसेनेचं वागणं क्लेशदायक आहे.” दरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही पथ्वीराज चव्हाण यांनी केलेला दावा खरा आहे असं म्हणत दुजोरा दिला होता.

काय म्हणाले होते पृथ्वीराज चव्हाण ?
माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला होता की, फक्त यावेळीच नाही तर 2014 मध्ये देखील भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून सत्ता स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. या विधानावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाल्याचे दिसून आले होते. दुसरीकडे नवाब मलिक म्हणाले, “राष्ट्रवादीनं शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नव्हता.” असं त्यांनी स्पष्ट केलं.

फेसबुक पेज लाईक करा – 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like