‘थोरातांची कमळा’ चित्रपट गाजला, आता ‘विखे-पाटलांची कमळा’ आला, पण…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे. वैफल्य,दुसरे काय,’ अशा शब्दांत शिवसेनेने सामनातून भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती टीकास्त्र सोडलं आहे. तर बाळासाहेब थोरात यांच्याविरुद्ध नरमाईची भाषा वापरल्याचे दिसून येते.

काही दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात हे मातोश्रीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावर विखे-पाटील यांनी काँग्रेस नेत्यांवर सडकून टीका केली होती तसेच उद्धव ठाकरे यांच्या कारभाराविरोधात ही टीका केल्यानंतर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती जोरदार प्रहार करण्यात आला आहे.

भाजपामध्ये विखे वनवासात

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नयेत हा साधा नियम विखे विसरले असतील तर त्यांनी राजकारणातून तूर्त दूर झालेलेच बरे. विखे अनेक वर्षे काँग्रेस पक्षात होते हा आता इतिहास झाला. वरचेवर पक्ष बदलण्याची कला त्यांना अवगत आहे व आपण आधीच्या पक्षात असताना काय उद्योग केले हे विसरण्याच्या कलेतही ते पारंगत आहेत. विखेंची मूळ पोटदुखी अशी आहे की, नगर जिल्ह्याच्या राजकारणातील त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब थोरात हे आता सत्तेत आहेत व निवडणुकीआधी सत्तेसाठी भाजपच्या चरणी लीन होऊनही विखे वनवासात आहेत. लाचारी व बेइमानी हे शब्द कोणी कोणासाठी वापरावेत यावर राजकारणात एक आचारसंहिता निर्माण होणे गरजेचे आहे. विखेंसारखे नेते थोरातांवर लाचार वगैरे शब्दबाण सोडतात तेव्हा त्यांच्या विसराळूपणाचे कौतुक वाटते. विखे ज्या पक्षात जातात त्या पक्षाशी ते कधीच एकनिष्ठ नसतात,’ अशी टीका विखेंवर करण्यात आली.

स्वतःचे ठेवायचे झाकून दुसऱ्यांचे पाहायचे वाकून

‘विखे काँग्रेस पक्षात होते. त्यांचे आजचे वैभव साम्राज्य काँग्रेसचीच दिलदारी आहे. आजचा तालेवारपणा ही काँग्रेसचीच देणगी आहे. नगर जिल्ह्यातील काँग्रेसच्या खाटेवर ते व त्यांचे घराणेच आतापर्यंत पाय लांब करून बसले होते, पण एक दिवस विखे सहकुटुंब शिवसेनेत आले. राज्यात व केंद्रात मंत्रीपदे भोगली व नंतर पुन्हा काँग्रेस पक्षात जाऊन सत्ताधारी झाले. काँग्रेसकडून सत्तापद भोगले व २०१९ च्या निवडणुकीपूर्वी ते फडणवीसवासी झाले. सध्याच्या कुटील राजकारणात यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नाही. पण स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे पाहायचे वाकून या विकृतीने तरी कळस गाठू नये,’ अशा शब्दांत विखेंनी सत्तेसाठी, पदांसाठी केलेल्या पक्षांतराचा उल्लेख करत त्यांच्यावर शरसंधान साधण्यात आलं.

विखे बाटगे तर राणे पावटे

सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या, निवडणुकीआधी भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांचा शिवसेनेने समाचार घेतला आहे. ‘सत्ता नसेल तर पाण्याशिवाय तडफडणार्‍या माशांप्रमाणे काही मंडळींची तडफड होते. विखे त्याच तडफडणार्‍या माशांचे प्रतिनिधी आहेत. संकटकाळात सगळ्यात जास्त काम हे विरोधी पक्षालाच असते. राज्याला किंवा देशाला संकटातून सावरण्यासाठी प्रति सरकारच्या विधायक भूमिकेत विरोधी पक्षाने वावरायचे असते, पण महाराष्ट्राच्या विरोधी पक्षात ‘बाटगे’ घुसले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाने स्वतःची प्रतिष्ठाच धुळीस मिळवली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तळमळ व तगमग आपण समजू शकतो. एकवेळ कोरोनावर लस सापडेल, पण विरोधकांच्या या तगमगीवर उपाय सापडणे कठीण आहे. निदान स्वतः फडणवीस हे भाजप-संघ परिवाराचे शंभर नंबरी कार्यकर्ते तरी आहेत, पण आम्हाला आश्चर्य वाटते ते भाजपच्या गोधडीत शिरून ठाकरे सरकारवर टीका करणार्‍या बाटग्यांचे. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणार्‍यांना महाराष्ट्र माफ करीत नाही हे त्या प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले. विखे-पाटील हे तर विरोधी पक्षनेते असतानाच भाजपमध्ये विलीन झाले. अशी हिंमत (लाचारी नव्हे!) अंगात भिनण्यासाठी खूप मेहनत करावी लागते,’ असा टोला देखील विखे-पाटलांना लगावण्यात आला.

पलायन केले नसते तर विखे सरकारमध्ये काँग्रेसचे नेते असते

‘पक्ष संकटात असताना ज्यांनी उंदराप्रमाणे उड्या मारल्या नाहीत व बुडते जहाज वाचवण्याचे प्रयत्न केले अशांना इतिहासाच्या पानावर स्थान मिळते. अशा एखाद्या पानावर विखे-पाटील कोठे आहेत काय? विखे-पाटलांनी काँग्रेसचा त्याग केल्याने काँग्रेसचे नुकसान झाले नाही व भाजपामध्ये गेल्याने भाजपाचा दिडकीचा फायदा झाला नाही. विखे यांनी ऐनवेळी पलायन केले नसते तर आज ते सरकारात काँग्रेसचे नेते असते. ती जागा नियतीने थोरातांना मिळवून दिली. कोलांटउडीचे डोंबारी राजकारण प्रत्येकवेळी चालतेच असे नाही. विखे-पाटील यांनी भाजपावर काय काय मळीच्या गुळण्या टाकल्या आहेत हे त्यांनीच एकदा आठवून पाहावे. विखे-पाटील अधूनमधून बोलतात, “आम्ही भाजपमध्ये खुश आहोत. जे विखेंना ओळखतात ते यावर विश्वास ठेवणार नाहीत. झक मारली आणि भाजपमध्ये गेले या चिडीतूनच ते टाळूवरचे केस उपटत असतील.” महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार स्थिर’ आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला. काँग्रेसची खाट कुरकुतेय की नाही ते पाहू, पण विखेंची ‘टूर ऍण्ड ट्रॅव्हल कंपनी बंद पडली आहे, मात्र त्यांची टूरटूर सुरु आहे. वैफल्य, दुसरे काय,’ अशा शब्दांत सामनामधून विखे-पाटलांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.