मग ‘त्या’ फुटकळ लेखकाची भाजपातून हकालपट्टी का केली नाही ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ पुस्तकावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी हेच शिवाजी असे सांगणाऱ्या लेखकावर कारवाई का झाली नाही ? पुस्तकामुळे भडका उडाला व लोकांच्या भावनांचा उद्रेक झाला. हे सर्व जाणूनबुजून करणाऱ्या फुटकळ लेखकाला भाजपातून एव्हाना हाकलून का दिले नाही ?, अशा प्रकारचे अनेक प्रश्न शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून उपस्थित करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदींशी तुलना करणारे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्यानंतर एकच चर्चा सुरु झाली. अनेकांनी यावर टीका देखील केली शेवटी भाजपचे मंत्री प्रकाश जवडेकर याना या पुस्तकाचा आणि भाजपचा काहीही संबंध नसल्याचे सांगावे लागले.

भाजप म्हणते, लेखक गोयल याने पुस्तक मागे घेतले, पण हा उपटसुंभ गोयल म्हणतोय, ‘छे, छे. मी पुस्तक मागे घेतले नाही, घेणार नाही.’ आता नव्याने लेखक म्हणतो, मी पुस्तकाचे पुनर्लेखन करणार. म्हणजे गोंधळ सुरूच आहे असा आरोप सामनातून शिवसेनेने केला आहे.गोयल हा माणूस खोट्या प्रसिद्धीचा भुकेलेला आहे आणि या पुस्तकामुळे त्याने ते साध्य देखील केले. गृहमंत्री अमित शहा यांनी आता असे जाहीर केले की, ‘जवाहरलाल नेहरू विद्यापीठात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. अशा घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात पाठवू.’ अशा वक्तव्यांमुळेही लोकांच्या भडकलेल्या भावना आणखी पेटत असतात. बरं, असे जर असेल तर भाजप कार्यालयात ‘नरेंद्र मोदी हेच शिवाजी’ असे सांगणाऱ्या लेखकावर त्याच कायद्याने कारवाई का झाली नाही ? असा प्रश्न सामनातून उपस्थित करण्यात आला आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर केली टीका
पुस्तकामुळे निर्माण झालेल्या वादावर चंद्रकांत पाटील यांनी वीर सावरकरांच्या वादाचा मुद्दा काढला होता त्यावर देखील सामनातून टीका करण्यात आली आहे. शिवरायांच्या बदनामीवर जे चिडले ते वीर सावरकरांच्या बदनामीवर का भडकले नाहीत ? पाटलांचा प्रश्न निरर्थक आहे. शिवसेनेने सावरकरांच्या संदर्भात ठाम भूमिका नेहमीच घेतली. नव्हे, फक्त शिवसेनेनेच घेतली. केंद्रात भाजपचे सरकार आहे. वीर सावरकरांना तत्काळ ‘भारतरत्न’ द्यावे, राष्ट्रपुरुषांच्या नामावलीत वीर सावरकरांना समाविष्ट करावे व वीर सावरकरांवर जो घाणेरडे विधान करील त्यावर खटले दाखल करण्याचे फर्मान केंद्रीय गृह मंत्रालयाने काढावे. हे करणार आहात का ? असा सवाल देखील सामनातून उपस्थित करण्यात आलेला आहे.

शरद पवार आणि जाणता राजा वक्तव्याचाही घेतला समाचार
नरेंद्र मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून विषय शरद पवार आणि जाणता राजा इथपर्यंत पोहचला यावर देखील सामनातून भाष्य करण्यात आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी एक बाळबोध प्रश्न विचारला आहे, ‘पवारांना जाणता राजा कसे म्हणता ?’ हा प्रश्न त्यांनी श्री.नरेंद्र मोदी यांनाच विचारायला हवा.असे सामनातून सुचवण्यात आले आहे.

तसेच छत्रपती शिवरायांना ‘रयतेचा राजा’ असे संबोधले जात असे. जनतेच्या प्रश्नांबाबत व भावनांबाबत खडानखडा माहिती असलेला लोकनेता म्हणजे ‘जाणता राजा’ हे पवारांच्या बाबतीत नरेंद्र मोदी यांनीच मान्य केले. त्यामुळे मुनगंटीवार यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मोदीच देतील. पवार जाणता राजा कसे ? असा प्रश्न उभा केल्याने आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरून भडकलेल्या वादाची आग कमी होणार नाही असे देखील सामनातून स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना सोयीप्रमाणे भूमिका बदलत नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्यांनी व शब्द फिरवणाऱ्यांनी याचे भान ठेवले पाहिजे, अशा शब्दांत शिवसेनेनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like