रुग्णालयातील तोडफोडीवरून शिवसेनेचा निशाणा, म्हणाले – ‘असे कृत्य करताना भाजप नेत्यांना लाज वाटायला हवी’

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. रुग्णांना बेड, इंजेक्शन आणि ऑक्सिजनसाठी वणवण फिरावे लागत आहे. मृत्यू नंतरही स्मशानभूमीत वेटिंग आहेच. अशी एकूण बिकट परिस्थिती असताना नाशिकमध्ये महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रूग्णालयात रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही या कारणावरून भाजपच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचे पती राजेंद्र ताजणे यांनी यांनी रुग्णालयाचे गेट तोडून त्यांची ईनोवा कार आतमध्ये नेली आणि तोडफोड केली. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेचा निषेध शिवसेनेनं नोंदवला आहे. दरम्यान, शिवसेना नेते आनंद दुबे यांनी एका पत्रकाराच्या ट्विटला उत्तर देताना सत्तेचा गर्व भाजप नेत्यांना चढला आहे. बिकट प्रसंगात रुग्णालयाची तोडफोड करताना त्यांना लाज वाटली पाहिजे असे त्यांनी म्हंटले आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी बिटको रुग्णालय राखीव आहे. सध्या ९०० रुग्ण या रुग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान राजेंद्र ताजणे यांनी या रुग्णालयात रेमडीसीवर इंजेक्शन मिळाले नाही म्हणून रुग्णालयाची तोडफोड केली होती. या घटनेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय स्टाफमध्ये घबराट पसरली होती.

या प्रकारावरून आनंद दुबे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, राजेंद्र ताजने यांनी केलेली तोडफोड आणि शिवीगाळ ही लाजीरवाणी घटना आहे. कोरोनाविरुद्ध संपूर्ण राज्य लढत आहे. आपले डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस मित्र जीवही पर्वा न करता लढत आहेत मात्र, दुसरीकडे भाजपा नेत्यांचा हा अहंकार दुर्भाग्यपू्र्ण आहे. केंद्रात आणि नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे, त्यामुळेच भाजप नेत्यांमध्ये एवढा अहंकार आहे. आपल्या नेत्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यसन घालावे असे आवाहनही त्यांनी केले.