UP Filmcity : ‘बॉलिवूडवाले घरात गांजा पिकवत असल्याचं चित्र निर्माण केलं जातंय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून त्यांच्या राज्यात फिल्मसिटी उभारण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला आहे. योगींच्या या निर्णयामुळे शिवसेनेने केंद्र सरकारला टोला लगावला आहे. ‘३७०’ कलम हटवल्यानंतर केंद्राने काश्मीरमध्ये अशा एखाद्या फिल्मसिटीची योजना राबवायला हवी,’ असे म्हणत शिवसेनेने केंद्र सरकारला टोला लगावला आहे. उत्तर प्रदेश मधील यमुना प्राधिकरण क्षेत्रात १००० एकरमध्ये ही फिल्मसिटी उभारली जाणारे आहे. आंतरराष्ट्रीय सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली याचे काम करण्यात येणार आहे. हा प्रकल्प पुढील दोन अडीच वर्षात पूर्ण होईल असे योगी आदित्यनाथ यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेनं योगींच्या या धडपडीचं स्वागत करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडमधील सध्याच्या समस्यांचा आढावा घेताना शिवसेनेकडून योगींना काही गोष्टींबाबत सावध करण्यात आलं आहे. सध्या हैदराबादची ‘रामोजी फिल्मसिटी’ व मुंबईच्या गोरेगावातील ‘चित्रनगरी’ यात चांगले काम सुरू आहे. मुंबईतील आर के स्टुडिओ विकला गेला आहे तर कमालिस्तान, मेहबूब यांसारखे मोठे स्टुडिओ हे अडचणींशी सामना करीत आहेत. ‘फिल्मसिटी’ किंवा ‘चित्रनगरी’ उभारण्याची कल्पना चांगली आहे, पण ती चालवणे खुप कठीण आहे त्याचाही अभ्यास करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे. ‘मुंबईस जी चमक-धमक मिळत असते त्यास ‘मायानगरी’चे अस्तित्व हे कारण आहेच.गेल्या काही महिन्यांपासून या मायानगरीस बदनाम करण्याचे, तिचे खच्चीकरण करण्याचे, त्यात काम करणाऱ्या प्रमुख मंडळींवर दबाव टाकण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जसे सिनेउद्योगाने व त्यात काम करणाऱ्या कलाकारांनी ही मुंबई सोडून जावे असे वातावरण निर्माण केले जात आहे. मायानगरीतले कलावंत, दिग्दर्शक, छायाचित्रणकार वगैरे मंडळींनी अभिनय कला सोडली असून ते ‘गर्दुल्ले’ बनले आहेत. त्यांनी आपापल्या घरांच्या गॅलरीत व बाल्कनीत गांजा, अफूची बाग फुलवली आहे, असे चित्र निर्माण केले जात आहे असा आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे.

या चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक राज्यानी आपल्या राजकीय प्रतिष्ठेसाठी करून घेतला. गुजरातमध्ये मोदी व सलमान खान पतंग उडवीत होते तर अमिताभ बच्चन गुजरातचे ब्रॅण्ड ऍम्बेसेडर होते. पंतप्रधान मोदी यांची ‘आंबे’ खाण्याची शास्त्रोक्त पद्धत कोणती याची सखोल माहिती जनसामान्यांना प्राप्त व्हावी याची जबाबदारी खिलाडी अक्षयकुमार याच्या खांद्यावर देण्यात आली होती. मोदी यांच्यावरील चित्रपटात विवेक ऑबेरॉय तर ‘मनमोहन’ सिंग यांच्यावरील चित्रपटात अनुपम खेर यांनी काम केले आहे.मुंबईच्या चित्रपटसृष्टीतूनच निघालेल्या या चमकत्या ताऱ्यांनी राजकारणी लोकांना प्रकाशझोतात आणले. आता त्याच चित्रपटसृष्टीच्या गळ्यास नख लावण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे, पण या मुंबईच्या चित्रनगरीचे महत्त्व कायम राहील असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त करण्यात येत आहे.