केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तीव्र निषेध

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – ९० टक्के शेतकऱ्यांची कर्ज माफी झाल्याचा दावा सरकार तसेच बँक मार्फत केला जात आहे. मात्र कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर कर्जमाफी केल्याची रक्कम अद्यापही जमा झाली नाही. सरकारच्या या फसव्या घोषणा, फसवी कर्जमाफी, जनावरांचा चारा, शेतकऱ्यांना बँकेकडून होणारी अडवणूक कर्जमाफीवर होणारी व्याज माफी, घोटाळा, शेतसारा वसुली, जनावरांचा चारा, या प्रश्नावर औरंगाबाद शिवसेनेने आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच केंद्र व राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारून तीव्र निषेध व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्ज माफी करण्यात आली आहे. परंतु ही पूर्णपणे फसवणूक असल्याचे शिवसेनेने विभागीय आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देत कर्जमाफी झाल्याचे कळवून ग्रीन लिस्ट मध्ये गाव असल्याचे सांगण्यात येत आहे. वर्ष उलटले तरी हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली नाही.
 शेतकऱ्यांनी खरीप रब्बी पीक विमा काढलेला असतांनाही कोणत्याही प्रकारची विमा रक्कम त्यांना मिळालेली नाही. या पीक विम्यातच घोटाळा असून शेतकरी कर्जमाफी पासून वंचित असल्याने शिवसेनेने विभागीय आयुक्तालयामार्फत सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न आज आंदोलनाच्या माध्यमातुन केला आहे. दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली आहे. मराठवाडा विभागात ६७ लक्ष ६१२ जनावरांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जानेवारी महिन्यापर्यंत चारा पुरेल असा दावा प्रशासन करत आहे मात्र चारा छावणीला की दावणीला असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला.
या आंदोलनात महापौर नंदकुमार घोडले, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, महानगर प्रमुख प्रदीप जैस्वाल, उपजिल्हाप्रमुख कृष्णा डोणगावकर, जयवंत ओक, राजेंद्र राठोड, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, बाबासाहेब डांगे, तालुका प्रमुख बप्पा दळवी, नगरसेवक ऋषिकेश खैरे, सिद्धांत शिरसाठ, रमेश पवार, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, विधानसभा संघटक राजू वैद्य, महिला जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, आनंदी अन्नदाते, संपर्क संघटक कला ओझा, सुनीता आऊलवार, यांच्यासह शिवसैनिकांचा सहभाग होता.