‘शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारचं, त्यासाठी मोदी-शहांच्या आशीर्वादाची गरज नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणार हे शिवसेना पक्षप्रमुखांना दिलेलं वचन मी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करणार असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. इतकेच नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीवार्दाची गरज नाही असेही ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिलं होतं की, एक ना एक दिवस मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करणारच. मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करणारच. यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या आशीर्वादाची गरज नाही. लोकसभेच्या वेळी युती करताना मी दिल्लीला गेलो नव्हतो. अमित शहा माझ्याकडे आले होते.”

पुढे ते म्हणाले, “युतीची बोलणी करताना अमित शहा म्हणाले होते की, ज्याच्या जास्त जागा येतील त्याचा मुख्यमंत्री होईल. त्यावेळी मी म्हणालो होतो की, आम्हाला जागांचं आणि सत्तेच समान वाटप आहे. जबाबदारीही समान हवी आहे. मुख्यमंत्री पद ही देखील जबाबदारीच आहे. मुख्यमंत्री पदाबद्दल अमित शहा आणि माझ्यात बोलणं झालं होतं. परंतु हे आमचं जे ठरलं आहे ते जर मी आताच जाहीर केलं तर पक्षात माझी अडचण होईल असे शहा म्हणाले होते. मी योग्य वेळ पाहून याबाबत जाहीरपणे सांगेन असे शहा म्हणाले होते. या गोष्टीची देवेंद्र फडणवीस यांना कल्पना नाही” असे ठाकरे म्हणाले.

Visit : Policenama.com