शिवसेनेनं घेतली लहान भावाची भूमिका, राष्ट्रवादीला दिला मोठ्या भावाचा मान !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर आता हे पक्ष स्थानिक निवडणुकीत वाद होऊ नये म्हणून नमती भूमिका घेत एकमेकांना मदत करत भाजपला बाजूला सारत आहेत. अहमदनगर महापालिका निवडणुकीतही शिवसेनेकडे संख्याबळ असूनही पक्षानं राष्ट्रवादीला मोठ्या भावाचा मान दिला.

अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी ऐनवेळेस भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले मनोज कोतकर यांची निवड झाली आहे. शिवसेना ही निवडणूक लढवण्यास उत्सुक होती. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यानं शिवसेनेचा या निवडणुकीत विजय निश्चित मानला जात होता. परंतु शेवटच्या दिवशी मनोज कोतकर यांना आपल्या पक्षात घेऊन राष्ट्रवादीनं आपल्या सहकारी पक्षाला एक जोरदार धक्का दिला.

राज्य सरकार चालवणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेत शहरांमध्ये स्थायी समिती सभापतीपदासाठी निवडणूक होणार होती. परंतु निवडणूक होण्यापूर्वीच शिवसेनेनं माघार घेतली. त्यामुळं मनोज कोतकर हे स्थायी समितीचे सभापती म्हणून बिनविरोध निवडून आले.

या निवडीनंतर शिवसेनेचे जल संधारण मंत्री शंकरराव गडाख आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी भूमिका स्पष्ट केली. गडाख म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात चर्चा झाल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी मधस्थाची भूमिका पार पाडत स्थानिक पातळीवर दोन्ही पक्ष एकत्र आणले.”

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनीही या निवडीनंतर एक पत्रक प्रसिद्ध करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले.