धक्कादायक ! शिवसेना वाहतूक सेनेच्या अध्यक्षाने पदाधिकारी महिलेकडे केली शरिर सुखाची मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेच्या संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील शिव वाहतूक सेनेचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांनी त्यांच्याच संघटनेच्या ३४ वर्षीय महिला पदाधिकाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यासंदर्भात पीडित महिलेने RCF पोलीस स्टेशनमध्ये अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी आणि विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निफोट यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला असून पुढील तपास चालू असल्याचे म्हटले आहे.

दीपक महेश्वरी आणि तक्रारदार महिला हे मागील तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून शिव वाहतूक सेनेत एकत्रितपणे काम करतात. महेश्वरी हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत तर तक्रारदार महिला त्यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी म्हणून काम करते. ३४ वर्षीय तक्रारदार महिला चेंबुर परिसरात राहते. त्या २८ मे रोजी काही कामानिमित्त महेश्वरी यांच्या कार्यालयात गेल्या असताना महेश्वरी यांनी त्यांना ‘तुम्ही मला आवडतात, सोबत राहात जा.’ असे म्हटले होते. या प्रकाराने चिडून महिला त्याठिकाणाहून निघून गेल्या. तरीही महेश्वरी यांनी त्यांना सातत्याने रात्री अपरात्री कॉल/मेसेजेस केले.

त्यांनी पुन्हा पुन्हा लैंगिक संबंधांची मागणी केल्यानंतर महिलेने स्पष्ट शब्दात नकार दिला. नकार मिळताच अश्लील शिवीगाळीसह ठार मारण्याची धमकी महेश्वरी यांनी दिली. यामुळे महिला प्रचंड घाबरून आजारीदेखील पडली.

या सर्व प्रकारानंतर पीडित महिलेने हिंमत करून पोलीस स्टेशनमध्ये महेश्वरी यांच्याविरुद्ध तक्रार देत FIR दाखल केली. याची पोलिसांनी गंभीर दाखल घेत महेश्वरी यांच्याविरुद्ध विनयभंग, अश्लील शिवीगाळ करून धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून अजून महेश्वरीला अटक केली नसल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोपान निफोट यांनी दिली.