PM मोदींसमोर CM ठाकरे म्हणाले – भारत ‘मजबूत’, ‘मजबूर’ नाही, डोळे काढून हातात देऊ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या चीन संदर्भातील सर्व पक्षीय बैठकीत सहभागी झाले. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी चीनबाबत राग व्यक्त करताना म्हणाले, भारत शांत आहे, याचा अर्थ आम्ही दुबळे आहोत असा होत नाही. भारत मजबूत आहे, मजबूर नाही. आमच्यात डोळे काढून हातात देण्याची क्षमता आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी चीनला इशारा दिला.

चीनसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकिला 20 राजकीय पक्षांना निमंत्रण होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक पार पडली. या बैठकीत विरोधकांनी आपण सरकारसोबत असल्याचे सांगितले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, आपण सगळे एक आहोत. चीनविरोधात सरकार जे काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा असेल, असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. लष्करातील जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आमचा पाठिंबा आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. या बैठकिला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आदी महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार म्हणाले, जवानांच्या बलिदानाचा सन्मान झाला पाहिजे. जवानांनी शस्त्र ठेवावेत की नाही हे आंतरराष्ट्रीय करारानुसार निश्चित केलं जातं. यामुळे अशा संवेदनशील प्रकरणी कराराचे पालन करणं गरजेचं आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला की, चिनी सैनिकांच्या घुसखोरीबाबत सरकारला कधी माहिती मिळाली ? चिनी सैनिकांनी कधी सीमेवर घुसखोरी केली. सरकारला प्रत्यक्ष ताबा रेषेवरील (LAC) फोटो उपग्रहाद्वारे मिळत नाहीत का ? बाहेरील गुप्तचर यंत्रणांनी LAC वरील हालचालींबाबत कुठलीही माहिती दिली नाही का ? असे प्रश्न उपस्थित केले.