‘काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की देशप्रेमींचा ?’ : उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काँग्रेसने आज (मंगळवार दि २ एप्रिल) हम निभाऐंगे या घोषणेसह आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यावर भाजपापाठोपाठ आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की, देशप्रेमींचा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी जाहीरनाम्यावर टीका केली आहे. देशद्रोहाचे कलम रद्द करण्याबाबत काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन देण्यात आले आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, “काँग्रेसला देशद्रोह्यांचा पंतप्रधान हवा की देशप्रेमींचा ? देशद्रोह हा मुद्दा बाजूला करा असे म्हणणारा कोणी पक्ष असेल त्या पक्षाला निवडणुका लढवण्याचा अधिकार नसावा. असे आश्वासन देणाऱ्या पक्षाची मान्यता रद्द केली पाहिजे” असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

‘जाहीरनाम्यातून काँग्रेसच्या पोटातली भूमिका ओठावर आली’
काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून पोटातली भूमिका ओठावर आली अशी टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी काँग्रेसचा जाहीरनामा वाचला नाही, परंतु आतापर्यंत जे वृत्त समोर आले त्यावरून असं म्हणेल की, जाहीरनामा प्रसिद्ध करण्याआधी काँग्रेसने त्याचं सरकार होतं त्यावेळी काय केलं ते पहावं.” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

‘राहुल गांधी यांच्या आजीने पण सांगितलं होतं की गरिबी हटाव किती गरिबी हटली ?’
पुढे बोलताना ते म्हणाले की, “काश्मीरचा दर्जा आणि महत्व कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र संपूर्ण देशात एक कायदा असला पाहिजे, काश्मीरमध्ये जो दहशतवाद उफळलेला आहे त्याची पाळेमुळे उखडून फेकली पाहिजेत. निवडणूक आली की थापा मारायच्या. राहुल गांधी यांच्या आजीने पण सांगितलं होतं की गरिबी हटाव किती गरिबी हटली असा सवाल करत काँग्रेसने मुद्दा गमावला” असे उद्धव ठाकरे म्हणाले.