‘त्या’बाबत शिवसेनेचं अजूनही ‘तळ्यात – मळ्यात’ ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग असलेली शिवसेना आता येथून पुढे काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीच्या बैठकांमध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याआधी शिवसेना एनडीएतून बाहेर पडली. शिवसेना आपली स्वतंत्र ओळख जपेल अशी भूमिका त्यावेळी पक्षाकडून घेण्यात आली होती. मात्र, आता राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वाच्या मुद्यांवर शिवसेना यूपीएसोबत असेल, असे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी सीएए आणि एनसीआरविरोधात रणनिती निश्चित करण्यासाठी विरोधी पक्षांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला शिवसेना उपस्थित राहिली नाही. याबद्दल संजय राऊत यांना विचारले असता, विसंवादातून हा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेना यापुढील बैठकांना हजर राहणार का, यावर बोलताना होकारार्थी उत्तर देत आम्ही नक्कीच विरोधी पक्षांच्या बैठकांना उपस्थित राहणार असे त्यांनी सांगितले.

संजय राऊत पुढे म्हणाले, आम्ही सीएए विरोधातल्या बैठकीला उपस्थित राहिलो असतो. मात्र काहीतरी विसंवाद झाला. याबैठकीला केवळ मुख्यमंत्र्यांनी हजर राहायचं आहे असे आम्हाला वाटले. मात्र, पक्षाचा कोणताही वरिष्ठ नेता या बैठकीला उपस्थित राहू शकतो, हे आम्हाला नंतर समजले. त्यामुळे सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना हजर राहू शकली नाही.

शिवसेना यूपीएचा भाग होणार का ? या प्रश्नावर सावध भूमिका घेत यूपीएमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव मिळाल्यास पक्षातील नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे राऊत यांनी सांगितले. सध्या आम्ही एनडीएमध्ये नाही. तसेच कोणत्याही गटाचा भाग ही नाही. राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या मुद्यांवर, राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयावर यूपीएनं भूमिका घेतल्यास शिवसेना विरोधी पक्षांसोबत जायचं का याबद्दल निर्णय घेईल. महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर आम्ही यूपीएसोबत असू असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/