‘सुशांत राजपूतच्या प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी झाली, त्याची भरपाई कोण करणार ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेना नेते संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या गुप्त भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यात चर्चा झाली. आज मुख्यमंत्र्यांनी शिवसेना आमदारांशी चर्चा केली आहे. दरम्यान, यासंदर्भात शिवसेना नेते अनिल परब यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

अनिल परब म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फक्त शिवसेनेच्या नव्हे तर महविकास आघाडीतील सर्व आमदारांशी बोलणार आहेत. आमचा वचननामा आहे, त्या दृष्टिने आमदारांशी बोलून त्यांच्या मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं, आश्वासने कशी पूर्ण करायची, याबाबत मुख्यमंत्री आमदारांशी चर्चा करणार आहेत. राज्यातील प्रश्न समजून तो सोडण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं

सामना शिवसेनेचं मुखपत्र असले तरी कोणत्याही पक्षाची बातमी त्यामध्ये लागू शकते. संपादकाला कोणाची मुलाखत घ्यायची हा अधिकार आहे. शरद पवार महाविकास आघाडीचे मार्गदर्शक असून ते राज्यासमोर येणाऱ्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्याशी सतत भेटतात, असा खुलासा परब यांनी केला.

शिवसेनेची नाहक बदनामी झाली त्याची भरपाई कोण देणार ?

अभिनेता सुशांत सिंह राजपूत हा ड्रग्ज घेत असल्याचं उघडकीस आलं आहे. दिल्लीची टीम मुंबईत आली तरी काय साध्य झालं ? या प्रकरणी जे नेते छाती बडवून घेत होते ते आता कुठे गेले ? सुशांत प्रकरणात शिवसेनेची नाहक बदनामी केली गेली, त्याची भरपाई कोण करणार ? असा, प्रश्न अनिल परब यांनी विचारात भाजपवर निशाणा साधला.

‘त्या’ भेटीची मुख्यमंत्र्यांना कल्पना – राऊत

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली भेट गुप्त नव्हती. शिवसेनेत अशा भेटी होत नाही. मुलाखतीसाठी ती भेट होती. त्याचे वेगळे अर्थ काढण्याचे काही कारण नाही. राजकारणात आम्ही वैयक्तिक शत्रुत्व मानत नाही, असे सांगतच त्या भेटीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कल्पना होती, असा खुलासा संजय राऊत यांनी केला.

आदित्यला अडचणीत आणणाऱ्यांसोबत जायचे कशाला ? शिवसेनेत सूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची नाहक बदनामी भाजपने केली आणि त्याचंच सोबत परत कशाला जायचे, असा सवाल सेनेच्या काही नेत्यांनी विचारला आहे. तसेच आदित्य यांच्यासाठी भाजपवर टीका करणारे संजय राऊत यांना याची थोडी सुद्धा जाणीव नाही का ? असे टीकास्त्र काही मंत्र्यांनी सोडलं आहे.