शिवसेना स्वतंत्र लढण्यावर ठाम

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन 

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली असली तरी आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून त्यामध्ये कोणताही बदला झाला नसल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.

अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर दोन्ही पक्षातील तणाव निवळला अशा आशयाच्या बातम्या आल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा अजेंडा आम्हाला माहिती आहे. पण शिवसेनेने आपला अजेंडा निश्चित केला आहे. आगामी निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढवणार असून यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे व अमित शहा यांच्या भेटीबद्दल दिली आहे. २०१९च्या निवडणुका स्वबळावर लढविण्याच्या अजेंडावर शिवसेना ठाम असल्याचे संजय राऊत यांनी पुन्हा बोलून दाखवलं.