Bihar : … म्हणून शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवता येणार नाही : निवडणूक आयोगाचा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेनं पूर्ण ताकदीनं बिहार विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी केली आहे. परंतु निवडणूक आयोगानं मात्र शिवसेनेला धनुष्य बाण चिन्हावर लढता येणार नाही असं सांगितलं आहे. बिहारमधील मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयु पक्षाचं चिन्ह बाण आहे. त्यांनी शिवसेनेच्या चिन्हावर आक्षेप घेतल्यानंतर आयोगानं हा निर्णय दिला आहे.

याबद्दल जेडीयु पक्षाकडून सांगण्यात आलं की, शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हामुळं मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण होऊ शकतो. जेडीयुला होणारं मतदान नकळत शिवसेनेला जाऊ शकतं. शिवसेना आणि झारखंड मुक्ती मोर्चा हे स्थानिक आणि प्रसिद्ध पक्ष नाहीत. त्यामुळं शिवसेनेला धनुष्यबाण हे चिन्ह देऊ नये अशी मागणी त्यांनी आयोगाकडे केली होती. नितीश कुमार यांच्या आक्षेपानंतर आता निवडणूक आयोगानं त्यांची मागणी मान्य करीत शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढता येणार नाही असं सूचित केलं आहे.

यावर बोलताना शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई म्हणाले, “बिहारमध्ये शिवसेनेला होणाऱ्या मतदानामुळं जेडीयु आणि त्यांचा मित्रपक्ष घाबरला आहे. शिवसेना बिहारमध्ये 50 जागा लढवणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवलं आहे. त्यामुळं आता आरक्षित नसलेल्या चिन्हांपैकी एक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक आयोगाला केली आहे. त्यामुळं शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना एकाच चिन्हावर निवडणूक लढवता येईल.”

हाच शिवसेनेच्या प्रचाराचा अजेंडा असेल
समोर आलेल्या माहितीनुसार, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणावरून बिहार सरकारनं महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांच्या बदनामीचा घाट घातला होता असा आरोप शिवसेनेकडून होत आहे. त्यामुळंच बिहार सरकारच्या राजकीय षडयंत्राला निवडणुकीच्या मैदानातून उत्तर देण्याचं शिवसेनेनं ठरवलं आहे. बिहार सरकारनं मूळ प्रश्न बाजूला ठेवून सुशांत प्रकरणावरून कसं राजकारण केलं हाच शिवसेनेच्या प्रचाराचा अजेंडा असेल अशी माहिती माहिती समजत आहे.