शिवसेनेच्या खा. भावना गवळींसह 9 जणांविरुद्ध FIR !

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना खासदार भावना गवळी (Bhavana Gawali), माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार (Balasaheb Munginwar), विधानसभा प्रमुख संतोष ढवळे, महेश पवार यांच्यासह 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गैरकायद्याची मंडळी जमवणं, अंगावर धाऊन जाणं, मारहाण करणं असे आरोप खासदार भावना गवळी यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांवर करण्यात आले आहेत. भावना गवळी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना पीक विम्याच्या मागणीसाठी जबाब दो आंदोलन करण्यात आलं. यावेळी पीकविमा कंपनी इफको टोकियोच्या जनरल मॅनेजरला मारहाण करण्यात आली होती. आता हे प्रकरण पोलिसात गेलं आहे.

‘शिवसेना घाबरणार नाही, आंदोलन सुरूच ठेवणार’
शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन केलं असता आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. या गुन्ह्याला शिवसेना घाबरणार नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे कंपनी देत नाही, तोपर्यंत आम्ही कपंनी विरोधात आक्रमक भूमिका घेत आमचं आंदोलन सुरूच ठेवणार असं भावना गवळी यांनी सांगितलं.

नेमकं प्रकरण काय ?
यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या बेमोसमी पावसामुळं शेतखऱ्यांचं खरीप हंगामात मोठं नुकसान झालं. मात्र विमा कंपनीकडून मोजक्याच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. उर्वरीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी भावना गवळी यांनी मोर्चा काढला होता. मॅनेजरनं समाधानकारक उत्तर न दिल्यानं संतप्त झालेल्या संतोष ढवळे यांनी मॅनेजरला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे हा प्रकरा गवळी यांच्या समोर घडला. त्यामुळं जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.