शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा कॅबिनेटमध्ये समावेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रपती भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अन्य मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या सात नेत्यांचा समावेश आहे. या सात नेत्त्यांमध्ये शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा समावेश असून अरविंद सावंत यांना कॅबिनेट मंत्री पद देण्यात आले आहे. सावंत यांनी ट्विट करून हा आनंद व्यक्त केला आहे. सावंत ट्विटमध्ये म्हणतात की, ‘दिल्ली येथे केंद्रीय मंत्रिपदाची शपथ… कायम आपल्या सेवेसाठी’ गेल्या सरकारमध्ये शिवसेनेच्या अनंत गीते यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्यात आले होते पण या वेळेस त्यांची जागा अरविंद सावंत यांनी घेतल्याचे दिसत आहे.

दरम्यान, राष्ट्रपती भवनात झालेल्या शपथविधी समारंभात महाराष्ट्रातील सात जणांचा समावेश करण्यात आला आहे. या नेत्यांमध्ये रामदास आठवले, नितीन गडकरी, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे, पियुष गोयल, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत यांचा समावेश आहे. नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, अरविंद सावंत यांचा कॅबिनेटमध्ये समावेश केला आहे तर रामदास आठवले, संजय धोत्रे, रावसाहेब दानवे यांना राज्यमंत्री म्हणून समावेश केला आहे.

या शपथविधी समारंभात २५ कॅबिनेट आणि ३३ राज्यमंत्री पदाची शपथ देण्यात आली आहे. सर्वसामावेशक मंत्रिमंडळ होण्यासाठी येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार देखील केला जाऊ शकतो.