जावयासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंकडून ‘युतीधर्मा’ला दगाफटका : खा. चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – जालनामधून शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरुद्ध उभे राहू नये, यासाठी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी खोतकरांची यशस्वी समजूत काढली. पण, रावसाहेब दानवे यांनी या सहकार्याची जाणीव ठेवून आपल्या जावयाला आवरले नाही. उलट त्याच्या प्रचारासाठी आजारी असल्याचा बहाणा करुन औरंगाबादच्या रुग्णालयात मुक्काम ठेवला आणि जावयासाठी भाजपच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. भाजपच्या प्रदेशाध्यक्षानेच युतीधर्माचे पालन न केल्याच्या तक्रारी चंद्रकांत खैरे यांनी थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही त्यांनी तक्रार केली आहे.

मतदान झाल्यानंतर आता ही बाब उघड करण्यात आली आहे. चंद्रकांत खैरे यांच्या तक्रारीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खैरे हेच युतीचे उमेदवार असून कुठल्याही अपक्ष उमेदवारांची दखल घेऊ नका, असे औरंगाबादमध्ये प्रचार सभा घेऊन सांगितले होते.

दानवे यांचे जावई आणि शिव स्वराज्य पक्षाचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी औरंगाबादमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढविली आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यामुळे खैरे यांना मिळणारी मराठा समाजाची हमखास मते जाधव यांच्याकडे वळाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंडखोरीबाबत मिडियामध्ये जोरात चर्चा झाली. पण प्रदेशाध्यक्ष असताना रावसाहेब दानवे यांनी जावयासाठी केलेल्या बंडाची मात्र चर्चा झाली नाही. पण आता मतदानानंतर कोणी कोणासाठी काम केले, याची चर्चा सुरु झाल्यानंतर दानवेंच्या या युतीधर्माविरोधात केलेल्या कामाची चर्चा सुरु झाली आहे.