भाजप आमदाराची बोचरी टीका, म्हणाले – ‘शिवसेनेचा तो निर्णय NOTA साठी वाईट बातमी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही महिन्यात पश्चिम बंगालमध्ये अनेक नेत्यांनी तृणमूल सोडून भाजपचे कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे तृणमूलच्या सर्वेसर्वा आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमोर मोठ आव्हान आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ममता बॅनर्जींच्या मदतीला धावून गेली आहे. मात्र, यावरुन रायबरेलीचे भाजपा आमदार दिनेश प्रताप सिंह यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. शिवसेना पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढणारी नाही, ही NOTA साठी वाईट बातमी आहे. कारण आता नोटाला सर्वात कमी मत मिळाल्याच्या यादीत NOTA चाच नंबर असणार आहे, अशी टीका सिंह यांनी केली आहे. शिवसेनेला पश्चिम बंगालमध्ये NOTA पेक्षाही कमी मत पडली असती, असेच त्यांनी आपल्या कमेंटमधून सूचवले आहे.

शिवसेनेने बिहार विधानसभेच्या काही जागा लढविल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालमध्येही शिवसेना ताकद आजमावून पाहणार का, अशी चर्चा सुरू होती. याबद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. सध्याची बंगालमधील परिस्थिती पाहता दीदी विरुद्ध सगळे असा सामना आहे. सगळे एम, म्हणजेच मनी, मसल आणि मीडिया एकट्या ममतांविरोधात वापरले जात आहेत. त्यामुळे बंगालमध्ये निवडणूक न लढवण्याचा आणि ममता दीदींसोबत ठामपणे उभे राहण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. ममता दीदींना उत्तम यश लाभो. कारण त्या बंगालच्या खऱ्या वाघीण असल्याचे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.