‘सगळीकडेच फेल… त्यात राफेल’ : शिवसेनेचा २०१९ मधील मोदींवरचा पहिला हल्ला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – व्यापार उदिमापासून शेतीपर्यंत सगळीकडेच ‘फेल’, महागाईचे ‘तेल’ आणि त्यात ‘राफेल’ असे म्हणत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातून मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला करण्यात आला आहे.

‘२०१९…परिवर्तनाचं वर्ष’ या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखातून शिवसेनेने लोकसभा निवडणुकांवरही भाष्य केले आहे.

‘मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या तीन राज्यांतील भाजपची सरकारे जनतेने उखडून फेकली. त्या अर्थाने २०१८ हे परिवर्तनाची नांदी नोंदविणारे वर्ष ठरले. आता २०१९ हे संपूर्ण परिवर्तनाचे वर्ष ठरेल काय,’ असा सवाल करत सामनातून सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले आहेत.

‘रसातळाला गेलेली अर्थव्यवस्था हा मावळत्या वषार्तील सर्वात तापदायक विषय ठरला. जिकडे पाहावे तिकडे मंदीच. उद्योग-व्यवसाय, व्यापार, शेती, रोजगारनिर्मिती अशा सगळ्याच क्षेत्रांना याचा जबर फटका बसला. २०१६ मध्ये नोटाबंदीच्या माध्यमातून सरकारने देशाच्या आर्थिक विकासाचा गळा घोटला. नोटाबंदीच्या जखमेवर फुंकर घालण्याऐवजी ‘जीएसटी’ लादून सरकारने जखमेवर आणखी मीठ चोळण्याचे काम केले,’ अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

‘सर्वाधिक नागवला आणि फसवला गेला, तो देशातील शेतकरी. महाराष्ट्रात तर फसव्या कर्जमाफीने आधीच उद्ध्वस्त झालेल्या शेतकºयांची चेष्टा करण्याचे पाप घडले. त्यामुळेच मागच्या वर्षभरात महाराष्ट्रात १८०० हून अधिक शेतकºयांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ९०९ आत्महत्या एकट्या मराठवाड्यातील आहेत. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे नव्या वषार्तील आश्वासनही असेच पोकळ ठरले,’ असं म्हणत सामनातून शेतकरी प्रश्नावरून मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

‘मावळत्या वर्षात सर्वाधिक गाजला तो राफेल घोटाळा. व्यापार उदिमापासून शेतीपर्यंत सगळीकडेच ‘फेल’, महागाईचे ‘तेल’ आणि त्यात ‘राफेल’असा सरकारचा मागच्या वर्षाचा प्रवास राहिला. त्यातून उसळलेल्या संतापाचा फटका मावळत्या वर्षात राज्यकर्त्यांनी अनुभवला,’ असेही सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आले आहे.